नागपूर/प्रतिनिधी ः राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होऊन पाच दिवस झाले तरी, विधिमंडळाचे कामकाज सुरळीत होण्याची चिन्हे नाहीत. राष्ट्रवादीचे
नागपूर/प्रतिनिधी ः राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होऊन पाच दिवस झाले तरी, विधिमंडळाचे कामकाज सुरळीत होण्याची चिन्हे नाहीत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे निलंबन आणि इतर मुद्दयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमधला तणावा वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शुक्रवारी विरोधकांनी कामकाजांवर बहिष्कार टाकत, विधानभवनाच्या पायर्यांवरच ठिय्या दिला. तसेच पायर्यांवरच प्रतिसभागृह भरवण्याचा देखील प्रयत्न केला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न, महापुरुषांच्या अवमानावरून विरोध आक्रमक असतानाच नागपूर येथील एका भूखंड वाटपाचे प्रकरण समोर आले. त्यात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संबंध असल्याने विरोधकांनी त्यांना लक्ष्य केले. त्यास उत्तर म्हणून भाजपच्या आमदारांनी दिशा सालियन प्रकरण पुढे केले. त्यावरून मोठा गदारोळ झाला व तणाव वाढत गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांच्या निलंबनामुळे त्यात भर पडली. सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करू देत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे म्हणत विरोधी आमदारांनी आजच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निर्णय मागे घ्यावा, अशी विरोधकांची मागणी आहे. मात्र, सरकार त्यास प्रतिसाद देत नसल्यामुळे विधानसभेचं कामकाज ठप्प झाले आहे. विधान भवनाच्या पायर्यावर ठाण मांडून बसलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. सीमाप्रश्नावर सर्वजण तिथल्या मराठी बांधवांसोबत उभे आहेत असा संदेश देण्यासाठी सरकारने दोन्ही सभागृहात एकमताने ठराव मंजूर करायला हवा. सोमवारी तो ठराव कोणत्याही परिस्थितीत घेण्यास भाग पाडू, असे अजित पवार म्हणाले. विधानसभा सदस्य म्हणून आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहून कामकाज थांबवायला हवे होते, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड यांनी भाषणे करत सरकारवर हल्ला चढवला.
अखेर आदित्य ठाकरेंनी सोडले मौन – दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणावर अखेर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच मौन सोडले. दिशाचा मृत्यू झाला, त्यादिवशी आपण रुग्णालयात होतो, असे आदित्य म्हणाले. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून शिंदे गट आणि भाजपने रान उठवले आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी याप्रकरणी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला, तर विधिमंडळातही यावर गदारोळ झाला. सरकारने ’एसआयटी’ चौकशीची घोषणा केली. यावर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलले. आदित्य ठाकरे म्हणाले, दिशा सालियान यांचा मृत्यू झाला त्या दिवशी मी रुग्णालयात होतो. त्या दिवशी माझ्या आजोबांचे निधन झालेले. त्यामुळे मला रुग्णालयात जावे लागले. विरोधकांना काय काढायचे ते काढू द्या. मात्र, एका 32 वर्षांच्या तरुणाला हे सरकार घाबरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घोटाळा काढून महाविकास आघाडीने त्यांना हादरवून सोडल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
COMMENTS