शिलाँग/वृत्तसंस्था ः फुटबॉल या खेळांमध्ये जर एखाद्या खेळाडूने खिलाडूवृत्ती दाखवली नाही तर, त्याला रेड कार्ड दाखवून बाहेर केले जाते. त्याच धर्तीवर
शिलाँग/वृत्तसंस्था ः फुटबॉल या खेळांमध्ये जर एखाद्या खेळाडूने खिलाडूवृत्ती दाखवली नाही तर, त्याला रेड कार्ड दाखवून बाहेर केले जाते. त्याच धर्तीवर आम्ही मागील 8 वर्षांत ईशान्य भारतात विकासाला मारक ठरणार्या अनेक गोष्टींना रेड कार्ड दाखवले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. नॉर्थ ईस्टर्न काउंसिलच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त शिलाँगमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकार भ्रष्टाचार, भेदभाव, घराणेशाही, हिंसाचार, प्रकल्पांत अडथळे निर्माण करणे व मतपेटीचे राजकारण हद्दपार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. पण या आजाराची मुळे खूप खोल असतात हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून हे वाईट मुळासकट उखडून टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमात बदल केला. त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण देशात दिसून येत आहे. यंदा केंद्र केवळ पायाभूत सोईसुविधांवर 7 लाख कोटींचा खर्च करत आहे. 8 वर्षांपूर्वी हा खर्च 2 लाख कोटींहून कमी होता. स्वातंत्र्याच्या 7 दशकांनंतर आपल्याला केवळ 2 लाख कोटींपर्यंत पोहोचता आले. कनेक्टिव्हिटीचा उल्लेख करत, पंतप्रधान मोदी म्हणाले की, डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे केवळ चर्चा व संवादच चांगला होत नाही, तर यामुळे पर्यटनापासून तंत्रज्ञानापर्यंत, शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, सर्वच क्षेत्रांतील सुविधांत वाढ होते, संधी वाढतात. आज आपण कतार फीफा वर्ल्डकपमध्ये जगभरातील संघ खेळताना पाहत आहोत. पण मला देशाच्या तरुणांवर विश्वास आहे. त्यामुळे आपण भारतातही असा उत्सव साजरा करून तिरग्यांचा जयजयकार करू असा मला ठाम विश्वास आहे. क्रीडा क्षेत्रासंबंधी सरकार समग्र दृष्टिकोन घेऊन वाटचाल करत आहे. याचा लाभ ईशान्येतील तरुणांना होत आहे. देशाचे पहिले क्रीडा विद्यापीठ ईशान्य भारतात असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ईशान्य प्रदेश जलविद्यूत निर्मितीचे ऊर्जाकेंद्र बनू शकतो- ‘नेट झिरो’ कार्बन उत्सर्जनासंदर्भात भारताच्या भूमिकेबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ईशान्य प्रदेश जलविद्युत निर्मितीचे उर्जाकेंद्र बनू शकतो. यामुळे या भागातील राज्ये अतिरिक्त उर्जेचे उत्पादक बनतील आणि उद्योगांचा विस्तार करण्यात आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यात योगदान देतील. या भागातील पर्यटनक्षमतेबाबत बोलताना ते म्हणाले की, या भागातील संस्कृती आणि निसर्ग या दोन्हीकडे जगभरातील पर्यटक आकर्षित होत आहेत. या भागातील पर्यटन परिमंडळे बनण्याची क्षमता असलेली ठिकाणे विचारात घेतली जात आहेत आणि त्यांचा विकास देखील करण्यात येत आहे. 100 विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना ईशान्येकडील भागांमध्ये पाठवण्याची कल्पना त्यांनी बोलून दाखवली. ज्यामुळे वेगवेगळ्या भागातील लोक आणखी जवळ येतील. हे विद्यार्थी या भागांचे सदिच्छा दूत बनतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
COMMENTS