सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या सज्जनगडावर रोप-वे सुविधा व्हावी, यासाठी आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे
सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या सज्जनगडावर रोप-वे सुविधा व्हावी, यासाठी आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून सज्जनगडावर रोप-वे सुविधा निर्माण करण्यास केंद्र शासनाच्या मार्ग निधी योजनेंतर्गत 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सज्जनगड हे एक मोठे धार्मिक तीर्थ आणि पर्यटनस्थळ असून या गडावर दररोज असंख्य भाविक आणि पर्यटक भेट देत असतात. यामध्ये वयस्कर लोकांची संख्या लक्षणीय आहे. पर्यटन वाढीबरोबर पर्यटक आणि खास करून वयस्कर लोकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी सज्जनगडावर रोप-वे सुविधा निर्माण करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याबाबतचे निवेदनही दोघांना देण्यात आले होते. ना. गडकरी आणि ना. फडणवीस यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. दरम्यान, सज्जनगडावर रोप-वे व्हावा. यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु ठेवला होता. आता त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
केंद्रीय मार्ग निधी 2022-23 अंतर्गत सज्जनगड येथे स्काय वॉक आणि लिफ्ट उभारणीसाठी 10 कोटी रुपये निधी केंद्र शासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे सज्जनगडावर जाण्यासाठी भाविक आणि पर्यटकांना रोप-वेची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. सज्जनगड येथील पार्किंग येथे एक लिफ्ट सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. गडावर असलेल्या देवीच्या मंदिरापर्यंत लिफ्ट आणि तिथून पुढे पायर्यापर्यंत स्काय वॉकची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. रोप-वे निर्मितीमुळे पर्यटनवाढीबरोबर वयस्कर भाविकांची आणि पर्यटकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. रोप वेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. गडकरी आणि ना. फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
COMMENTS