नवी दिल्ली/प्रतिनिधी ः अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात शुक्रवारी 9 डिसेंबर रोजी रात्री भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात शुक्रवारी 9 डिसेंबर रोजी रात्री भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याचे समोर आले आहे. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले आहेत. जखमी भारतीय सैनिकांवर गुवाहाटीत उपचार सुरू आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चकमक 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबर रोजी चिनी सैन्य सीमेच्या आत येण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी तेथे तैनात भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत त्यांना माघारी धाडले. या चकमकीत दोन्ही बाजूचे काही जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी घटनेनंतर दोन्ही बाजूंनी तेथून माघार घेतल्याचे वृत्त आहे. चकमकीत जखमी झालेल्या सर्व भारतीय जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चिनी सैनिक आमने-सामने आल्यानंतर भारताच्या एरिया कमांडरने आपल्या चिनी समकक्षासोबत फ्लॅग मीटिंग घेतली. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये सीमावादाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंनी हे प्रकरण संयुक्तपणे सोडवण्याचे मान्य केले. त्याच वेळी, दोन्ही बाजूंकडून शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.
विशेष म्हणजे गलवाननंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये झटापट झाली. यापूर्वी गलवान खोर्यातही भारत आणि चीन यांच्यात संघर्ष झाला होता. अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारत आणि चीनने आपापल्यावर्चस्वाचे क्षेत्र कायम राखले आहे. मात्र, चीनकडूनया क्षेत्रात नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ड्रॅगन 2006 पासून भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी’चे सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झडल्याच्या वृत्ताला संरक्षण दलातील अधिकार्याने दुजोरा दिला असला तरी त्याबाबतचा तपशील देण्यास मात्र त्याने नकार दिला. चकमकीत भारतीय जवानांपेक्षा चीनचे सैनिकच अधिक जखमी झाले आहेत, असा दावा या अधिकार्याने केला. चकमकीत काही भारतीय जवानांच्या हाता-पायांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर गुवाहाटी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जाते. भारतीय जवानांची 600 चिनी सैनिकांशी चकमक झाली, असे सूत्रांनी सांगितले.
भारतीय जवान किरकोळ जखमी ः संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये 9 डिसेंबर रोजी झालेल्या संघर्षाबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज, मंगळवारी लोकसभेत निवेदन केले. भारतीय जवानांनी पराक्रम गाजवत चीन्यांना पिटाळून लावले. तसेच या संघर्षात काही जवान किरकोळ जखमी असून सर्व जवान सुरक्षित असल्याचे राजनाथ यांनी सांगितले. यासंदर्भातील निवेदनात राजनाथ म्हणाले की, अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबर 2022 रोजी चीनच्या पिपल्स लिबरेश आर्मी (पीएलए) तुकडीने तवांग सेक्टरच्या यांग परिसरात घुसखोरीचा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सज्ज असलेल्या भारतीय सैन्याने चीनी सैन्याच्या जोरदार प्रतिकार केला. यावेळी दोन्हीकडच्या सैन्यात संघर्ष झाला. भारतीय सैन्याने पराक्रम गाजवत चीनी सैन्याला परत जाण्यास भाग पाडले. या संघर्षात दोन्हीकडचे सैनिक जखमी झाले. मात्र एकाही सैनिकाचा मृत्यू झाला नसून कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
COMMENTS