नगर : रेखा जरे हत्येच्या घटनेनंतर बाळ बोठे फरार झाला होता. मात्र, नगर पोलिस दलाने अत्यंत सूक्ष्मरितीने तपास करून बाळ बोठे याला अटक केली. त्या दरम्यान
नगर : रेखा जरे हत्येच्या घटनेनंतर बाळ बोठे फरार झाला होता. मात्र, नगर पोलिस दलाने अत्यंत सूक्ष्मरितीने तपास करून बाळ बोठे याला अटक केली. त्या दरम्यान तपासात त्याने हत्येची सुपारी दिल्याचे कबूल करत रेखा जरे या आपली बदनामी करतील या भीतीने हत्या केल्याचे त्याने कबूल केले, असे नमूद करून रुणाल जरे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, बाळ बोठे मोठया दैनिकात संपादक होता. तो सतत वेगवेगळ्या कार्यालयातील अधिकार्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणून त्यांना धमकावून खंडणी उकळत असे. माझी आई रेखा जरे यांच्या हत्येची 12 लाख रुपयांना सुपारी दिल्याचे बाळ बोठे याने कबूल केले. मात्र, सुपारीची रक्कम कोणी दिली व का दिली याचा तपास अद्याप बाकी आहे. तसे दोषारोपपत्रात स्पष्ट दिसते. या अनुषंगाने मी स्वतः या प्रकरणी सतत चौकशी करत असून माहिती घेत आहे. तसेच याचसंदर्भात माझी त्यावेळी आईसोबत चर्चा होत असे. तसेच याच संदर्भातील काही कागदपत्रे मला मिळाली. त्यानुसार माझे असे मत आहे की, बाळ बोठे याने ज्या अधिकार्यांविरुध्द आईच्या लेटरपॅडवर निवेदने दिली तसेच दैनिक सकाळ या वर्तमानपत्रात मोठया बातम्या छापल्या व या अधिकार्यांनी बाळ बोठे यास पैसे देऊन माझी आई रेखा जरे यांना गप्प बसविण्यास सांगितले. मात्र, आईने गप्प न बसता या प्रकरणांच्या चौकशीचा पाठपुरावा चालू ठेवला. त्याच अधिकार्यांकडून पैसे घेऊन बाळ बोठे याने आईच्या हत्येची सुपारी दिली असावी, असे मला वाटते. त्यामुळे या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास करून दोषी अधिकार्यांवर गुन्हे दाखल व्हावेत, असे जरे यांनी म्हटले आहे.
आईच्या बनावट सह्या
आईच्या हत्येनंतर दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाले आहे. या तपासादरम्यान बाळ बोठेच्या घरात, कार्यालयात आईचे लेटरपॅड, काही कागदपत्रेही तपासात हस्तगत झाली. या सह्यांबाबत फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानुसार बाळ बोठेकडे सापडलेल्या कागदपत्रांवरील सह्या आईच्या नसून बनावट, खोटया असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बाबी अलिकडच्या काळात आईच्या लक्षात आल्या होत्या की, बोठे हा आईच्या खोट्या सह्या करुन अनेक तक्रार निवेदने दडपत आहे व यामध्ये फक्त बोठेच नसून हे तक्रार निवेदन ज्या अधिकार्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आहे, तेही यात सामील आहेत किंवा दोषी आहेत. तसेच बाळ बोठेचे काही सहकारीही यामध्ये सामील असून या पंटरमार्फत बोठेने अनेकांना ब्लॅकमेल केले आहे. बाळ बोठेने तपासात सांगितले की, रेखा जरे या माझी बदनामी करतील ही भीती मला होती तर या अनुषंगाने मी जेव्हा सर्व प्रकरण समजून घेतले तर माझ्या असे लक्षात आले की, बोठे घातपात करेल असे आईला आधीच लक्षात आले होते. त्यामुळेच आईने हत्येपूर्वी स्वहस्ताक्षरात एक पत्र लिहून ठेवले होते. त्या पत्रात तिने बाळ बोठेचा सगळा बुरखा फाडला होता. यामध्ये बाळ बोठे कशाप्रकारे ब्लॅकमेल करतो, राजकीय पाठबळ कसे मिळवतो, स्त्रियांचा कसा वापर करतो अशा अनेक बाबी यात असून बोठे व आईमधील फोनवरील संभाषणसुध्दा रेकॉर्डींग स्वरुपात असून यातही बोठेने बोलता बोलता अनेक बाबींचा खुलासा केला. त्यानुसार तो किती मोठा विकृत व्यक्ती आहे, हे स्पष्ट होते, असे रुणाल जरे यांनी यात म्हटले आहे. बोठे सुरुवातीला क्राईम रिपोर्टर होता. त्यामुळे पोलिस दलाची कामाची पध्दतही त्याला चांगलीच अवगत होती व पोलिस दलात सुध्दा त्याने अनेकांशी मैत्री ठेवली होती. या सर्व बाबींचा गैरफायदा घेऊन बोठेने मोठया प्रमाणात अवैध मालमत्ता गोळा केलेली आहे. सरासरी 50-60 हजार पगार असणारा बोठे अवघ्या 15-20 वर्षात गडगंज संपत्तीचा मालक होतो व याच अवैध संपत्तीचा तो गैरवापर करुन गैरकृत्य करतो. तो ज्या पदावर कार्यरत होता, त्या पदाचा गैरवापर करून त्याने मोठ्या प्रमाणात अवैध मालमत्ता जमवली असून अनेक अधिकारी यानिमित्ताने उघडे पडू शकतात व आईची हत्या ज्या बदनामीच्या भीतीने झाली, ती बदनामी नेमकी काय? हेही स्पष्ट होईल, असे म्हणणेही रुणाल जरे यांनी यात मांडले आहे.
पाच वर्षांतील कॉल तपासा
बाळ बोठेचे मागील 5 वर्षातले मोबाईल कॉल डिटेल्स, मोबाईल लोकेशन्स, त्याचे फेसबुक व व्हॉटसअॅप यातील चॅटींग, व्हीडीओज, मेसेज तसेच यादरम्यान ज्या-ज्या अधिकार्यांच्या तक्रार-निवेदने अथवा दै. सकाळमध्ये मोठया बातम्या आल्या, त्या सर्वांचे मोबाईल कॉल डिटेल्स, मोबाईल लोकेशन्स, फेसबुक, व्हॉटसअॅप यातील चॅटींग, मेसेज, व्हीडीओ, तसेच बोठे व या सर्वांचे जवळचे नातलग, मित्र या सर्वांची कसून चौकशी करावी व या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही रुणाल जरे यांनी केली आहे.
न्यायालयात दोषारोप पत्र
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 8च्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरील जातेगांव घाट (ता. पारनेर) येथे मारेकर्यांकरवी हत्या करण्यात आली आहे. अहमदनगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील, या प्रकरणाचे तपासी अधिकारी व नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील व त्यांच्या सहकारी पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी सूक्ष्म तपास करीत सर्व आरोपींना अटक केल्यावर, बाळ बोठेकडून सुपारी घेऊन ही हत्या केल्याचे आरोपींनी कबूल केले. त्यानुसार या सर्व आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
—
COMMENTS