Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातील वेदांत नांगरे बनला अल्ट्रा सायकलिस्ट

कराड / प्रतिनिधी : इन्स्पायर इंडिया (पुणे) या संस्थेने आयोजित केलेल्या 643 किलोमीटर पुणे ते गोवा सायकल स्पर्धेत भाग घेऊन वेदांत अभय नांगरे (वय

एलआरपी आयुर्वेद कॉलेजचा 100 टक्के निकाल
विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकविणे ही जयंत पाटील यांची विकृत संस्कृती : पृथ्वीराज पवार
संगमनेर शेतकी संघाचा गुणवत्तेतून राज्यात प्रथम क्रमांक – आ. डॉ. तांबे

कराड / प्रतिनिधी : इन्स्पायर इंडिया (पुणे) या संस्थेने आयोजित केलेल्या 643 किलोमीटर पुणे ते गोवा सायकल स्पर्धेत भाग घेऊन वेदांत अभय नांगरे (वय 22) याने ही स्पर्धा दिवस-रात्र सलग सायकल चालवून यशस्वी पूर्ण केली. त्यासाठी त्याला 31 तास, 30 मिनिटे इतका वेळ लागला. संपूर्ण भारतामधून या स्पर्धेत 32 सोलो स्पर्धकांनी व आठ रिले टीमनी भाग घेतला होता.
अतिशय खडतर समजली जाणारी ही स्पर्धा पुणे, खंबाटकी, पसरणी, महाबळेश्‍वर, मेढा मार्गे सातारा, बेळगाव, एम. के. हुबळी, आंबोली, सावंतवाडी, गोवा या मार्गे पूर्ण होते. ही स्पर्धा डेक्कन क्लिफ हँगर या नावाने ओळखली जाते. दख्खनच्या पठारावरून ही स्पर्धा सह्याद्रीच्या डोंगरातून तसेच काहीशा घनदाट अशा जंगलातून, कड्यातून गोव्याच्या किनारपट्टीकडे जाते. या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाच्या पाठीमागे कार सहित सपोर्टसाठी क्रू टीम असते. जी स्पर्धकाला त्याचे खाणे पिणे तसेच इतर देखभाल करत असते.
वेदांतचे क्रू मेंबर म्हणून त्याची आई सौ. कल्याणी नांगरे, वडील अभय नांगरे, बहीण कु. अपूर्वा नांगरे, नातेवाईक शुभम नांगरे व ऋतुराज माने हे होते. रायडर याने प्रत्येक तासाला त्याच्या आवश्यकतेप्रमाणे काही ठराविक कॅलरीचा आहार घेणे अपेक्षित असते. क्रू टीम ती पुरवत असते. या पूर्ण स्पर्धेमध्ये वेदांतने काही मिनिटांची झोप घेतली होती. बेळगावच्या आसपास पाऊस पडायला काही वेळासाठी सुरुवात झाली. परंतू पावसातही कोणत्या स्पर्धकांने सायकल चालवणे थांबवले नव्हते.
या स्पर्धेचा कट ऑफ टाईम हा 38 तासांचा आहे. तसेच जर स्पर्धकाने 32 तासाच्या आतमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली. तर तो रॅम नावाच्या अमेरिकेतील स्पर्धेला पात्र होतो. ती स्पर्धा याहून कठीण अशी आहे. ज्यामध्ये स्पर्धकाला 12 दिवसांमध्ये 5 हजार किलोमीटरचे अंतर अमेरिकेतील एका टोकावरून वेगवेगळ्या वातावरणाचा सामना करून दिवस-रात्र सायकल चालवून पूर्ण करायचे असते. आत्तापर्यंत भारतातील चारजणांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे.
या अगोदर म्हणजेच जुलै 2022 मध्ये वेदांत नांगरे याने आयर्न मॅन ही खडतर स्पर्धा थून स्वित्झर्लंड येथे यशस्वी पूर्ण केली आहे. अनेक युवक युवतींनी आपला कम्फर्ट झोन सोडून आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे यावे असे वेदांत याला वाटते. ज्यामुळे आपल्या सर्व क्षमतांचा विकास होऊ शकेल. तसेच अनेक कठीण चॅलेंजेसला सामोरे जाण्याची क्षमता तयार होवू शकेल.
चौकट
वेदांतच्या स्पर्धेकडे तसेच तयारीकडे खा. श्रीनिवास पाटील, सौ. रजनीदेवी पाटील व सारंग पाटील विशेष लक्ष ठेवून होते. तो आल्यानंतर अतिशय कौतुकाने त्यास फेटा तसेच शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

COMMENTS