Homeताज्या बातम्यासंपादकीय

अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट?

 अंधेरी पोटनिवडणुकीतील निवडणूक कदाचित दोन आघाड्यांमध्ये होण्याची किंवा चुरशीची शक्यता होती, ती आता कालांतराने मावळत चालली, असे दिसत आहे. मुळातच श

समझदार सभी जानते है….. बिसलेरी !
सभागृहाचे गांभीर्य नष्ट होतेय का ! 
पुस्तक खरेदीतील सामाजिक (अ) न्याय ! 

 अंधेरी पोटनिवडणुकीतील निवडणूक कदाचित दोन आघाड्यांमध्ये होण्याची किंवा चुरशीची शक्यता होती, ती आता कालांतराने मावळत चालली, असे दिसत आहे. मुळातच शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेली ही जागा, शिवसेनेने, जी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना नावाने ओळखली जाते. त्या शिवसेनेने आपला दावा केला होता; तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांची शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे गटाने ही या जागेवर आपला दावा केला. परंतु अखेरीस ही जागा अनेक तांत्रिक कारणास्तव बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या एकनाथ शिंदे गटाने लढावयाची भूमिका सोडून दिली. तर, भारतीय जनता पक्षाकडून मुरजी पटेल यांचा अर्ज भरण्यात आला; परंतु, त्यांचा अर्ज आता मागे घ्यावा, अशा आशयाचे विनंती पत्र राज ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना लिहिल्याने, यावर आता उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे. बहुधा, या निवडणूकीत मुरजी पटेल यांची देखील माघार घेण्यात येईल, अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. तर, दुसऱ्या बाजूला एडवोकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही भाजपा सोडून कोणाही बरोबर जाण्यास तयार आहोत अशी भूमिका घेतल्याने कदाचित ते अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला साथ देतील अशीही शक्यता आहे साधारणतः २५ उमेदवारांनी या निवडणुकीत अर्ज दाखल केल्याने बहुतेक उमेदवार हे आघाडी किंवा वेगवेगळ्या पक्षांचे डमी उमेदवार असतात. त्यामुळे त्यांचीही माघार होऊ शकते.  कदाचित अंधेरी पोटनिवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता, आता अधिक निर्माण झाली आहे. ज्या पोटनिवडणुकीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय रणधुमाळी मोठ्या प्रमाणात होईल, असे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच, राजकीय मतभेदांपेक्षा ते वैरत्वाकडे जाऊ लागलेलं, तर अशा परिस्थितीत अंधेरी पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, अशी भावना किंवा असा विचार सर्वपक्षीय नेत्यांच्या मनात येणे, ही देखील राजकीयदृष्ट्या एक चांगली बाब आहे. ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना, ‘आम्ही कोणत्याही पक्षाबरोबर जाण्यास तयार आहोत आमच्यासाठी सर्व पक्षांचे दरवाजे उघडे आहेत’, परंतु त्यांनी भाजप सोडून सर्व पक्षांशी आपली युती किंवा आघाडी होऊ शकते, असं वक्तव्य केल्याने कदाचित राष्ट्रवादीच्या आशाही पल्लवीत झाल्या असतील. कारण ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर हे २०१४ च्या निवडणुकीपासूनच राष्ट्रवादी पक्षाबरोबर अंतर राखून बोलण्याचं कार्य सातत्याने करीत आहेत. त्यामुळे प्रथमच महाराष्ट्राच्या राजकारणात ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्याही आशा नक्कीच वाढल्या असतील! अर्थात या सगळ्या शक्यता आहेत त्यामुळे अजूनही अंधेरी पोट निवडणूक ही होणारच नाही, असे ठामपणे सांगता येत नाही. कारण, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या पत्राविषयी प्रतिक्रिया देताना, ‘आता उशीर झाला असला तरीही यावर केवळ मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही’, त्यामुळे माझ्या काही सहकाऱ्यांशी म्हणजे एकनाथ शिंदे गटांशी बोलावं लागेल, अशी एक प्रतिक्रिया त्यांनी दिल्याने कदाचित या निवडणुकीत सर्वपक्षीय भूमिका सर्वांमध्ये ठरू पाहत आहे.  ही राजकीयदृष्ट्या एक चांगली बाब राज्यातील राजकारणात म्हणता येईल. 

COMMENTS