रशिया-युक्रेनच्या युद्धाचा पुन्हा भडका

Homeताज्या बातम्यादेश

रशिया-युक्रेनच्या युद्धाचा पुन्हा भडका

युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांचा संघर्षाचा भडका फेबु्रवारी महिन्यापासून उडाला. रशियाने आपले सैन्य युक्रेनमध्ये घुसवत संपूर्ण युक्रेन देश ताब्यात घ

जागावाटपांची कोंडी फुटेना
विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा
बालविवाह आणि बालमातांचे वाढते प्रमाण…

युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांचा संघर्षाचा भडका फेबु्रवारी महिन्यापासून उडाला. रशियाने आपले सैन्य युक्रेनमध्ये घुसवत संपूर्ण युक्रेन देश ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र युक्रेनने कडवा प्रतिकार करत रशियाच्या आशा धुळीस मिळवल्या. त्यानंतर युद्धांचे ढग काहीसे शांत झाल्याचे दिसून येत होते. रशिया आता या युद्धातून माघार घेईल, शांततेच्या वाटाघाटी होतील असे वाटत असतांनाच, रशियाने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. तसेच जर आमच्या सत्तेला कोणत्या देशाने रोखण्याचे काम केल्यास अणवस्त्र डागण्याची धमकी देखील दिली. रशिया इतक्यावरच थांबला नाही, तर रविवारपासून त्याने युक्रेनवर तब्बल 85 पेक्षा अधिक क्षेपणास्त्र डागत विध्वंस सुरु केला आहे.
खरे तर आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना जगाला आता युद्ध नको आहे, असे आवुर्जन सांगितले. भारताच्या या भूमिकेचे संपूर्ण जगतातून स्वागत झाले. मात्र रशियाने पुन्हा एकदा युद्ध तीव्र केले आहे. यातून केवळ विनाश होणार एकंदरित चित्र आहे. कोरोनाच्या सावटामुळे संपूर्ण जग दोन-अडीच वर्ष मागे पडले आहे. त्यात युद्धाचे सावट. युक्रेन आणि रशियाचे युद्ध जरी होत असले तरी, इतर देशांवर मोठे दूरगामी परिणाम पडतांना दिसून येतात. इंधनांच्या किंमती मोठया प्रमाणात वाढतांना दिसून येत आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर म्हणजे 1945 नंतर संपूर्ण युरोप खंड पुन्हा एकदा भीषण महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. हे वास्तव आता संपूर्ण जगाने स्वीकारले आहेच. मात्र रशिया विध्वंसक हानी करणार नाही, असा संपूर्ण जगताचा होरा होता, मात्र रशियाने तो खोटा ठरवला. तसेच अमेरिकेचे वाढते वर्चस्व मोडीत काढण्याची नामी संधी रशियाने साधली. मात्र यात रशियाचे मोठे आर्थिक नुकसान होतांना दिसून येत आहे. खरेतर अमेरिकेने युक्रेनला नाटोमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव ठेवल्यापासूनच म्हणजे 2014 पासून अमेरिका आणि रशिया यांच्यात युद्धाचे डावपेच सुरू आहेत. याच डावपेचात 2014 साली रशियाने युक्रनेचा एक तुकडा क्रिमिया तोडून आपल्या ताब्यात घेतला. त्याचवेळी डोनेत्स्क आणि लुहांस्क या प्रांतांतील रशियन समर्थकांनी युक्रेनपासून वेगळे होण्यासाठी हिंसाचार सुरू केला होता. या दोन्ही प्रांतांना मिळून ‘डोनबास’ असे म्हटले जाते. त्या हिंसाचारात 15 हजार नागरिकांचा नाहक बळी गेला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून युक्रेन आणि रशियामध्ये शांतता करार करण्यात आला. यालाच ‘मिंक्स करार’ म्हटले जाते. ‘मिंक्स करार’ करताना रशियाने डोनबासमध्ये हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, रशियाने या कराराला तिलांजली देत, युक्रेनवर हल्ला चढवला. हा हल्ला चढवून 8 महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. तरी देखील रशिया हा पुन्हा तीव्र करतांना दिसून येत आहे. रशियाचा हा हल्ला युक्रेन परतावून लावत आहे. अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रांची मदत पाठवली असली, तरी नाटोचे सैन्य युक्रेनच्या पाठिशी राहिल्याचे दिसून येत नाही. नाटोचे सैन्य जर युके्रनच्या पाठीशी राहिले तर, तिसर्‍या महायुद्धाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नाटोसह अमेरिका सावध पावले टाकतांना दिसून येत आहे. मात्र यात युक्रेन देश बेचिराख झाला असून, या देशाला पुन्हा उभे राहण्यासाठी अनेक वर्ष लागतील. मात्र युद्धामुळे केवळ विनाशच होतांना दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा अनेक दशके दोन्ही देश मागे जातांना दिसून येत आहे.

COMMENTS