श्रीनगर : काँग्रेसमधून पक्षत्याग करून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी नव्या पक्षाची स्थापना केली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दि
श्रीनगर : काँग्रेसमधून पक्षत्याग करून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी नव्या पक्षाची स्थापना केली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव त्यांनी डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ असे ठेवले आहे. सोबतच पक्षाच्या झेंड्याचे देखील त्यांनी अनावरण केले. एकूण तीन रंगाच्या या झेंड्यात निळा, पांढरा आणि पिवळ्या रंगाचे तीन उभे पट्टे आहेत.
आझाद यांनी त्यांच्या पक्षाचे नेते आणि कामगारांची रविवारी बैठक घेतली होती. त्यानंतर सोमवारी त्यांनी याबाबत घोषणा केली. आझाद म्हणाले की, आम्हाला असे नाव हवे होते जे लोकशाहीवादी, शांततावादी आणि स्वतंत्र वाटेल. माझ्या पक्षाच्या नावासाठी उर्दू, संस्कृत अशा भाषेतील जवळपास 1500 नावे माझ्याकडे आली होती. हिंदी आणि उर्दू या भाषांचे मिश्रण म्हणजे हिंदुस्थानी. ध्वजातील पिवळा रंग हा सृजनशीलता, विविधतेत एकता दर्शविणारा आहे. पांढरा रंग शांततेचे प्रतिक आणि निळा रंग स्वातंत्र्य, आकाशाची उंची आणि समुद्राची खोली दर्शविणारा आहे. पक्षाची विचारसरणी पक्षाच्या नावाप्रमाणेच असेल. धर्मनिरपेक्ष लोक पक्षात सहभागी होऊ शकतात. आझाद यांनी 26 ऑगस्ट रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हेच त्यांच्या कार्यपद्धतीतून पक्षाला उद्ध्वस्त करत आहेत, अशी टीका करत त्यावेळीच त्यांनी नवा पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. जम्मू-काश्मिरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळवून देणे आणि भूमिपुत्रांना रोजगार, निवारा देणे हा पक्षाचा अजेंडा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी काँग्रेसमधील जवळपास दोन डझनभर महत्वाच्या नेत्यांनीही आझाद यांच्या समर्थनात काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यात माजी मुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह माजी मंत्री, माजी आमदारांचाही समावेश होता. याशिवाय मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपी आणि आणि अपनी पार्टी या पक्षातूनही दोन माजी आमदार आझाद यांना येऊन मिळाले होते.
COMMENTS