बनावट सोनेतारणात वापरला… बड्या सराफाचा शिक्का?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बनावट सोनेतारणात वापरला… बड्या सराफाचा शिक्का?

खरे सोने भासवण्यासाठीची शक्कल, पोलिसांकडून चौकशी सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी : बनावट सोने तारण म्हणून ठेवताना हे सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवण्यासाठी आरोपींनी नगर शहरातील एका प्रतिष्ठित व मोठ्या सराफी दु

एकलव्य संघटनेच्या विभागीय संपर्क कार्यालयाचे ब्राम्हणगावात उद्घाटन
कोरोनामुळे साई मंदिराची कवाडे पुन्हा बंद
अकोले शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

अहमदनगर/प्रतिनिधी : बनावट सोने तारण म्हणून ठेवताना हे सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवण्यासाठी आरोपींनी नगर शहरातील एका प्रतिष्ठित व मोठ्या सराफी दुकानाच्या नावाचा शिक्का या दागिन्यांवर मारला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा बनावट शिक्का कसा व कोठे केला तसेच संबंधित बड्या सराफी व्यावसायिकाचा या फसवणूक प्रकरणाशी काही संबंध आहे काय, याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या केडगाव शाखेतील बनावट सोने तारण कर्ज खात्यांची तपासणी सुरू असताना दुसरीकडे जप्त केलेल्या बनावट दागिन्यांची तपासणीही पोलिसांकडून सुरू आहे. या बनावट दागिन्यांवर दिशाभूल व फसवणूक करण्यासाठी तसेच सोने खरे आहे, असे भासवण्यासाठी शहरातील एका प्रतिष्ठित व मोठ्या सराफी दुकानाचा शिक्का मारला असावा, असे प्राथमिक चौकशीतून समोर येत आहे.
संत नागेबाबा सोसायटीमधील 38 खात्यांमध्ये आतापर्यंत 2542 ग्रॅम म्हणजेच तब्बल अडीच किलो सोन्याचे बनावट दागिने आढळून आले आहेत. याद्वारे 79 लाख 19 हजारांंची फसवणूक झाली आहे. आणखी काही खात्यांची तपासणी केली जाणार आहे. कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींची पोलिस कोठडीत चौकशी सुरू आहे. यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाशी संबंधित दोघांना ताब्यातही घेण्यात आले आहे. मात्र, बनावट दागिन्यांची तपासणी सुरू असताना यातील बहुतांशी दागिन्यांवर नगर शहरातील एका प्रतिष्ठित व मोठ्या सराफ दुकानाच्या नावाचा शिक्का मारल्याचे समोर आले आहे. बनावट दागिन्यावर हॉल मार्किंग करून व या दुकानाच्या नावाचा शिक्का मारून हे दागिने खरे आहेत, असे भासवण्याचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला, असे तपासात समोर आले आहे.

तो सल्ला देणारा ताब्यात
हॉल मार्किंगसाठी वापरले जाणारे मशीन घेण्याचा सल्ला देणार्‍या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे मशीन हे भांड्यांवर नाव टाकण्यासाठी व डिझाईन करण्यासाठी वापरले जाते असे सांगून या मशीनची माहिती आरोपींना दिली होती, असे या व्यक्तीकडून सांगण्यात आले आहे. या संदर्भात अधिक चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

COMMENTS