कारवाईसाठी आले अन् पथक भरपेट जेवून गेले सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत इस्लामपुरात झाला साखरपुडा…

Homeसातारा

कारवाईसाठी आले अन् पथक भरपेट जेवून गेले सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत इस्लामपुरात झाला साखरपुडा…

एका मिनी मंगल कार्यालयात साखरपुड्याच्या निमित्ताने झालेली गर्दी.

मनेका गांधी जीवदया निर्मल हॉस्पिटल उभारणीचा पंचनामा
हुमगाव-बावधन प्रलंबित रस्त्यासाठी चाळीस गाव एकवटले
शेततळ्यात बुडून सख्ख्या भावंडांचा मृत्यू; पाटण तालुक्यातील रोमणवाडी येथील दुर्दैवी घटना

इस्लामपूर /प्रतिनिधी : एका मिनी मंगल कार्यालयात साखरपुड्याच्या निमित्ताने झालेली गर्दी….सोशल डिस्टन्सचा उडालेला फज्जा…भरारी पथकाचा छापा…अन् भरपेट जेवण करून गेलेले पथक याची खुमासदार चर्चा  शहरात चांगलीच रंगली. “महसूल कर्मचाऱ्यांच्या आनंद सोहळ्यात विरझन कशाला ? असा माणुसकीचा धर्म पाळला खरा… पण कोरोनाचा संसर्ग वाढण्यासकारवाईचा फार्स करणाऱ्या पथकाला जबाबदार धरले जाणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परवानगी २५ लोकांची अन् उपस्थित होते शे-दीडशे..!           

याबाबत माहिती अशी : इस्लामपूर शहराच्या पश्चिमेला एका उपनगरामध्ये मिनी मंगलकार्यालय आहे.  इथं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेली सर्व बंधने झुगारून साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. मंगल कार्यालयाच्या बाहेर नातेवाईकांच्या चार चाकी उभ्या होत्या. रस्त्यावर एवढी वाहने लागल्याने अनेकांनी उत्सुकतेने मंगलकार्यालयात डोकावले. शासनाचे नियम पायदळी तुडवत पै-पाहुण्यांनी मोठी गर्दी केली होती. परिसरातील दक्ष नागरिकांनी या गर्दीचे व्हिडिओ तयार केले अन् भरारी पथकालाही कळवले.         भरारी पथक काही वेळात कार्यालयाच्या आवारात दाखल झाले. कारवाईच्या निमित्ताने हे पथक आत घुसले. चौकशीअंती महसूल विभागातील एकाच्या कुटुंबातील साखरपुडा होता. कारवाई साठी माहिती घेताना ओळख निघाली अन् कारवाई थांबली. मग कारवाई बाजूला राहिली. गप्पांचा फड रंगला. अनाहूतपणे आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी जेवणावळीच्या पंक्तीत या पथकाने भरपेट जेवणाचा आस्वाद घेतला.          आता कारवाई होणार याकडे लक्ष ठेवलेल्या कर्तव्यदक्ष नागरिकांनी मात्र हे पथक जेवण करून मंगल कार्यालय बाहेर पडलेले पाहिले.कोणतीच कारवाई झाली नसल्याने कर्तव्यदक्ष नागरिकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. साखरपुड्यातील गर्दीचा व्हिडिओ, भरारी पथकाचा कारवाईचा नुसताच फार्सचा व्हिडीओ केल्याने खळबळ माजली आहे. कोरोनाच्या काळात गेल्या वर्षभरामध्ये अनेक विवाह सोहळे शासनाच्या नियमांची पायमल्ली करत झाले. मात्र अशा पथकांच्या कार्यपद्धतीमुळे कोणालाही कारवाईला सामोरे जावे लागलेले नाही. अनेकांना कोरोनाचा प्रसाद गर्दीमुळे यापूर्वीच मिळाला आहे. तरीही पथकाचा हा फार्स याला जबाबदार कोण ?  असा प्रश्न अधोरेखित होत आहे.        मंगल कार्यालय मालक ,साखरपुड्याच्या निमित्ताने वधू-वराकडील जबाबदार पालक व भरारी पथकावर प्रशासन स्तरावर कारवाई होणार का ?  याकडे लक्ष लागून राहिले आहे.

COMMENTS