नितीन वैद्य, छाया कदम, यांना पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नितीन वैद्य, छाया कदम, यांना पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर

मुंबई : साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या प

हदगाव तालुक्यातील नागरिकांच्या धान्य वितरण व राशनकार्डच्या तात्काळ त्वरित समस्या सोडवा.
शेततळ्यात बुडून महिलेसह दोन मुलींचा मृत्यू
रेल्वे बोगीला आग लागून 10 जणांचा मृत्यू

मुंबई : साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी निर्माते-दिग्दर्शक नितीन वैद्य, अभिनेत्री छाया कदम, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल साबळे आणि वैद्यकीय पत्रकार संतोष आंधळे यांची निवड झाली आहे.
सोबतच ’भुरा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी जेएनयूचे प्रा. शरद बाविस्कर यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत ’बलुतं’ पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता दादर माटुंगा कल्चरल सेंटर, मुंबई येथे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या अध्यक्षतेखाली दया पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यादरम्यान स्टॅन्ड अप कॉमेडी या लोकप्रिय ठरत चाललेल्या कलाप्रकारात एक वेगळा ठसा निर्माण करणार्‍या बीडच्या अंकुर तांगडे आणि नागपूरच्या नेहा ठोंबरे यांचा ’ब्लु मटेरियल-दलितों का शो’ हा स्टॅन्ड अप कॉमेडीचा प्रयोगही होणार आहे. यंदाचा हा चोविसावा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यासंबंधी अधिक माहिती देताना दया पवार प्रतिष्ठानचे सचिव प्रशांत पवार यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाले नव्हते त्यामुळे यावर्षी सलग तीन वर्षांचे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. दया पवार यांच्या ’बलुतं’ या गाजलेल्या आत्मकथनाला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 2018 पासून नावाजलेल्या आत्मकथनांना ग्रंथाली पुरस्कृत ’बलुतं’ पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या तिसर्‍या ’बलुतं’ पुरस्कारासाठी ’भुरा’ पुस्तकाचे लेखक प्राध्यापक शरद बाविस्कर यांची निवड करण्यात आली आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयामध्ये प्राध्यापक शरद बाविस्कर अध्यापनाचे काम करत आहेत. धुळे ते जेएनयु असा प्रवास सांगणारे त्यांचे ’भुरा’ हे पुस्तक तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले आहे. दया पवार स्मृती पुरस्कारांच्या इतर मानकर्‍यांपैकी नितीन वैद्य हे गेल्या तीन दशकांपासून प6कारिता, सिनेमा आणि मालिकेच्या क्षेत्रात कार्यरत असून दशमी क्रिएशन या निर्मिती संस्थेचे ते संचालक आहेत. दया पवार स्मृती पुरस्काराचे यंदाचे 24 वे वर्ष असून आतापर्यंत या पुरस्काराने प्रेमानंद गज्वी, उत्तम कांबळे, प्रकाश खांडगे, हिरा बनसोडे, गंगाधर पानतावणे, विठ्ठल उमप, रझिया पटेल, जयंत पवार, दिनकर गांगल, वामन केंद्रे, लक्ष्मण गायकवाड, उल्का महाजन, ज्योती लांजेवार, उर्मिला पवार, समर खडस, कॉ. सुबोध मोरे, संजय पवार, गझलकार भीमराव पांचाळे, डॉ. जब्बार पटेल, शाहीर संभाजी भगत, लोकनाथ यशवंत, प्रतिमा जोशी, भीमसेन देठे आणि नागराज मंजुळे, वीरा राठोड, सुधारक ओलवे, गणेश चंदनशिवे, सयाजी शिंदे, राहुल कोसंबी, आनंद विंगकर, मेघना पेठे, शीतल साठे, मलिका अमर शेख, मंगेश बनसोडे आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.

COMMENTS