केवळ प्रसिद्धीसाठी …

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केवळ प्रसिद्धीसाठी …

राज्यात शेतकर्‍यांची स्थिती बिकट हे सांगायला कुण्या ज्योतिष्याची गरज नाही. मात्र ही परिस्थिती बिकट असल्याचे माहित असून उपयोग काय. कारण शेतकर्‍यांची प

आरक्षण आणि आत्महत्यांचे सत्र
राजस्थानातील खांदेपालट
आयुष्याची दोर बळकट करायची की पंतगांची ?

राज्यात शेतकर्‍यांची स्थिती बिकट हे सांगायला कुण्या ज्योतिष्याची गरज नाही. मात्र ही परिस्थिती बिकट असल्याचे माहित असून उपयोग काय. कारण शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असतांना, जर आपण केवळ माध्यमांसमोर स्टंटबाजी करत, मिरवत असाल, तरी शेतकर्‍यांचे प्रश्‍न पाचच काय, पन्नास वर्षांत देखील सुटणार नाही.
शिंदे सरकारमधील विद्यमान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सध्या अमरावती, मेळघाटात शेतकर्‍यांच्या घरी मुक्काम करत, पाहणी दौरा केला. हा पाहणी दौरा स्तुत्य असला, तरी त्यातून साध्य काय झाले, या प्रश्‍नांचे उत्तर शोधले तर उत्तर नकारात्मक मिळते. मात्र यानिमित्ताने कृषीमंत्री सत्तार आपल्याकडे माध्यमांचा कॅमेरा खेचण्यात यशस्वी झाले. टीईटी घोटाळयात दोन्ही मुलींची नावे आल्यानंतर राज्यभर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यांचा मंत्रिमंडळातील पत्ता कापला जाईल, अशी चर्चा सुरु असतांना, त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली. मंत्रिपदाची झुल अंगावर चढवताच, कृषीमंत्री सत्तार यांनी विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी एका शेतकर्‍याच्या घरी मुक्काम करत, त्यांची परिस्थिती जाणून घेतली. मात्र हे सर्व करत असतांना, सत्तार यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. टीईटी घोटाळयामुळे नाचक्की झालेली प्रतिमासंवर्धन करता आले. याचबरोबर आपण कृषी खात्याला योग्य न्याय देऊ शकतो, असा एक संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण दौर्‍यात त्यांनी प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे खेचण्यात ते कमालीचे यशस्वी झाले. कृषीमंत्री सत्तार यांच्या दौर्‍याच्या पूर्वसंध्येला मेळघाटातील एका तरूणाने आत्महत्या केली. सत्तार यांनी या तरूणाच्या घरी जाऊन त्या कुटुंबियांचे सांत्वन देखील केले. मात्र मेळघाटातील कुपोषण, शेतकर्‍यांच्या आत्महत्या हे न सुटणारं कोडं आहे. कारण कुपोषणाबरोबरच शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी स्थानिक रोजगार येथील जनतेला मिळवून द्यावा लागणार आहे. तरच, येथील नागरिक सक्षम होऊ शकेल. त्याशिवाय असलेले व्यसनाचे प्रमाण कमी करावे लागेल. कारण येथील नागरिक दोन पैसे हातात आले की, त्या पैशांचा खर्च व्यसनावर होतो. त्यामुळे आत्महत्या वाढत चालल्या आहेत. शिवाय कुपोषणाचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढल्यामुळे, हे कुपोषण रोखायचे कसे, हा देखील प्रश्‍न आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या इतक्या मोठया योजना असतांना, तो आहार, निधी जातो कुठे असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे मेळघाटातील प्रश्‍न जसे वेगळे आहे, तसेच शेतकर्‍यांचे प्रश्‍न देखील. नैसर्गिक आपत्तीनंतर राजकीय नेते पाहणी दौरा करतात, प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश देतात. मदतीचे आश्‍वासन देतात आणि निघून जातात. मात्र त्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळाली की नाही, याची कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे शेतकरी कायमच नागवला जातो, असा जो आरोप होतांना दिसून येत आहे, तो खरा ठरतो. यंदा विदर्भात अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला. उभी पिके वाहून गेली. शेतकर्‍याचे अर्थचक्र कोलमडून गेले. नेत्यांचे दौरे सुरू झाले असले, तरी शेतकर्‍यांच्या हाती उध्वस्त झालेली पिके पाहण्याखेरीज काहीही उरलेले नाही. बळीराजासोबत एक दिवस हा उपक्रम लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांच्या सहभागाने राज्यभर 100 दिवस राबविण्यात येणार आहे. याद्वारे प्राप्त सूचना लक्षात घेऊन प्रभावी धोरण राबविण्यात येईल, असे कृषीमंत्री सत्तार यांनी सांगितले. मात्र आपल्या सोबत सतत माध्यमांचे कॅमेरे फिरते ठेवल्याने शेतकर्‍यांचे दुःख कळणार नाही. त्यासाठी त्यांच्यात समरस व्हावे लागेल. त्यांचे दुःख समजून घ्यावे लागेल. तरच शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटतील, अन्यथा असे दौरे, आश्‍वासने केवळ हवेतच विरतील.

COMMENTS