अपघाताचा नव्हे मृत्यूचा महामार्ग

Homeताज्या बातम्यासंपादकीय

अपघाताचा नव्हे मृत्यूचा महामार्ग

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या अपघातांमुळे अनेक मोठया व्यक्तींचा मृत्यू हा चटका लावून देणारा ठरला. शिवसंग्राम संस्थेचे अध्यक्ष, आम

एवढा गहजब कशासाठी ?
न्यायालयीन निकालांची परिभाषा
राजस्थानातील खांदेपालट

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या अपघातांमुळे अनेक मोठया व्यक्तींचा मृत्यू हा चटका लावून देणारा ठरला. शिवसंग्राम संस्थेचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांच्या अपघातानंतर काल उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातात झालेला मृत्यू चटका लावून देणारा ठरला. वास्तविक पाहता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अपघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक ठरतांना दिसून येत आहे. त्यातून होणारे मृत्यू, आणि होणारी समाजाची हानी न भरून निघणारी आहे. रस्ते रुंद आणि वेगवान झाल्यामुळे अत्याधुनिक वाहने रस्त्यावर धावतांना दिसून येत आहे. त्यांचा वेगही कमालीचा वाढला आहे. या वाढत्या वाहनांना रोखणे तसे अशक्य आहे, मात्र या वेगवान वाहनामुळे मोठया प्रमाणावर अपघात होतांना दिसून येत आहे. वेगाच्या या धुंदीत आपण हकनाक जीव गमावून बसतांना दिसून येत आहे. पूर्वीच्या काळी वाहनांची संख्या कमी होती. शिवाय वेगावर देखील मर्यादा होती. मात्र आता वेगाने मर्यादा ओलांडली आहे. अपघात झाला म्हणजे, तुम्ही जखमी नाही, तर जागेवरच गतप्राण व्हाल, अशीच गती या वाहनांची अलीकडे दिसून येत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर अपघात रोखण्याची मुख्य जबाबदारी आता वाहनचालकांवर आहे. सुरक्षित अंतर, सुरक्षित वेग आणि सुरक्षित प्रवास ही त्रिसूत्री अमलात आणली पाहिजे. वाहनांतील ब्रेकपेक्षा मनाचा ब्रेक हा अपघात टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, हेही लक्षात ठेवले पाहिजे तरच हे अपघात रोखता येईल. देशात दहशतवादी हल्ले होतात, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक व्यक्तींचा अपघातात मृत्यू होतांना दिसून येत आहे. अपघात कसे रोखता येईल, हा सर्वात मोठा प्रश्‍न असून, त्यादृष्टीने कठोर उपाययोजना आपल्याला कराव्या लागणार आहेत. मानवी चुकांमुळे होणारे अपघात नवीन नाही. मेटे यांच्या अपघातावेळी देखील गाडीची असणारी गती, आणि चालकाला डुलकी लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर मिस्त्री यांच्या अपघातात देखील गाडीचा वेग जवळपास 130 किमीचा होता, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन गाडीने 9 मिनिटात जवळपास किमान 20 किमी अंतर कापले होते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सायरस मिस्त्री यांनी सीटबेल्ट न लावल्यामुळे अपघात झाल्यानंतर लगेचच त्यांचा मृत्यू झाला. जवळपास 70 हजार कोटी रुपयांची संपत्ती असणारे सायरस मिस्त्री देखील या अपघातातून स्वतःला वाचवू शकले नाही, तर तिथे सर्वसामान्य माणसांचे काय. मानवी चुकांना कसा लगाम घालता येईल, वेगावर कसे नियंत्रण ठेवता येईल, सीटबेल्ट लावणे कसे बंधनकारक करता येईल, याबाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. दररोज, या जिल्ह्यात, त्या तालुक्यात, अपघातांची मालिका सुरु आहे. त्यामुळे अपघात रोखणे मानवांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे. एकीकडे तंत्रज्ञान वेगवान झेप घेत आहे. चारचाकी वाहनात मोठे बदल होत आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने या गाडया निकामीच ठरतांना दिसून येत आहे. सायरस ज्या गाडीत होते, ती गाडी मर्सिडीज होती, त्याची किंमत साधारण दोन ते तीन कोटींच्या घरात असतांना देखील, ही गाडी त्यांचा जीव वाचवू शकली नाही. तोच कित्ता मेटे यांचा देखील. त्यामुळे या गाडयांना जसा वेग प्रदान करण्यात येतो, त्याचप्रकारे त्यांना सुरक्षा देखील प्रदान करता आली पाहिजे. गाडीतील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. त्याशिवाय गाडी धावणारच नाही, असे तंत्रज्ञान उपलब्ध करावे लागणार आहे. गाडीची स्पीड मर्यादित ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे सामाजिक भान, आणि वाहनचालकांवर मर्यादा याद्वारेच आपण अपघात रोखू शकतो, अन्यथा या अपघातांना रोखणे सध्यातरी सहज शक्य नाही.

COMMENTS