मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झालेल्या गाडीला मदत करण्यासाठी धावून गेलेल्या दोघांवर काळाने घाला घातल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
पनवेल/प्रतिनिधी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झालेल्या गाडीला मदत करण्यासाठी धावून गेलेल्या दोघांवर काळाने घाला घातल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. यामध्ये मदतीसाठी धावून गेलेल्या दोन्ही देवदूतांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती पनवेलमधील रहिवासी आहेत, तर यांच्या सोबत मदतीसाठी गेलेली तिसरा व्यक्ती जखमी झाली असून त्याच्यावर पनवेलमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर मुंबईच्या दिशेने जाणार्या एका स्विफ्ट कारला कंटेनरची मागून धडक बसली. त्यामध्ये स्विफ्ट कारचा मागून चक्काचूर झाला होता. याच दरम्यान या परिसरात असलेले पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते (वय 26) व पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिले व इतर दोघेजण त्या अपघातात मदत करण्यासाठी आपली मर्सिडीज गाडी घेऊन थांबले. मर्सिडीज कारमधून उतरून अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी स्विफ्ट कारच्या दिशेने जात असतानाच मर्सिडीज कारच्या मागून आलेल्या आयशर टेम्पोची मर्सिडीजला धडक बसली. या अपघातात मोहिते आणि प्रथमेश बहिरा (वय 24) यांचा मृत्यू झाला आहे, तर त्यांच्यासोबत असलेले मित्र हर्षद खुदकर हे जखमी झाले असून त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. नगरसेवक तेजस कांडपिले हे सुखरूप आहेत. या विचित्र अपघातातील इतर जखमींना पनवेलच्या अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
COMMENTS