मुंबई/प्रतिनिधी : शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूचे गूढ वाढतांना दिसून येत आहे. कारण अपघातानंतर, त्यांचा चालक एकनाथ कदम याने सातत
मुंबई/प्रतिनिधी : शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूचे गूढ वाढतांना दिसून येत आहे. कारण अपघातानंतर, त्यांचा चालक एकनाथ कदम याने सातत्याने उडवा-उडवीचे उत्तरे दिल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वाढवला आहे. मात्र, एकनाथ कदम याच्याकडून पोलिसांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. मेटे यांच्या गाडीचा चालक सतत आपला जबाब बदलत आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुढ आणखीन वाढले आहे. मेटे यांचा अपघात की घातपात असा सवाल उपस्थित केला जात असतांना, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पोलिसांकडून आता विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक आणि मेटे यांच्या अंगरक्षकाच्या फोन कॉलचा डेटा तपासला जाणार आहे. या दोघांनाही विनायक मेटे यांच्या अपघातापूर्वी कोणाचे फोन आले होते, हे पोलिसांकडून पाहिले जाईल. तसेच मेटे यांच्या गाडीला धडक देणार्या आयशर ट्रकच्या चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांकडून आयशर ट्रकचा चालक आणि मेटेंच्या चालकाला समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार होती. या चौकशीतून कोणती माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच पोलिसांकडून विनायक मेटे यांच्या अपघातावेळी पुणे-मुंबई महामार्गावरून जाणार्या वाहनांचे सीसीटीव्ही फुटेजही पाहिले जाईल. यामध्ये एखाद्या गाडीची हालचाल संशयास्पद दिसते का, हे पाहिले जाईल.
3 ऑगस्टला गाडीचा झाला होता पाठलाग
शिवसंग्राम संघटनेच्या एका कार्यकर्त्याने खळबळजनक दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे परिसरात विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग झाला होता. तेव्हादेखील एक आयशर ट्रक मेटे यांच्या गाडीला कट मारत होता, असे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याने सांगितले. त्यावेळी विनायक मेटे बीडहून पुण्याला परतत होते. मेटे यांची गाडी पुण्यापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर असताना एक आयशर ट्रक आणि कारने त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यावेळी चॉकलेटी रंगाच्या आयशर ट्रकने विनायक मेटे यांच्या गाडीला दोन-चारदा कट मारली. कारमध्ये बसलेले दोन-चारजण ट्रक मागे घे, पुढे घे, असे सांगत असल्याचे संबंधित कार्यकर्त्याने सांगितले.
COMMENTS