लढवय्या नेतृत्वाची दुर्दैवी अखेर !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

लढवय्या नेतृत्वाची दुर्दैवी अखेर !

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक विनायक मेटे यांचे वयाच्या अवघ्या पन्नाशीत अपघाताने निधन झाल्याची वार्ता कानी आली, अन् एक क्षण कानावरचा विश्वासच उडाला. अत

मंडल आयोगाने कर्नाटकात मराठा ओबीसी आणि एसटी ठरवला; महाराष्ट्रात का नाही ? 
पलटीबाज नितिशकुमार ! 
पवन खेरा अटकेचा अन्वयार्थ ! 

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक विनायक मेटे यांचे वयाच्या अवघ्या पन्नाशीत अपघाताने निधन झाल्याची वार्ता कानी आली, अन् एक क्षण कानावरचा विश्वासच उडाला. अतिशय लढावू आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मैदानात उतरलेल्या या लढाऊ नेतृत्वाचा शेवट ऐन उमेदीच्या काळात एका अपघाताने व्हावा, ही बाब मनाला सुन्न करणारी आहे. लोकशाही व्यवस्थेत राजकीय-सामाजिक मत-मतांतरे निश्चितपणे असतात. ते तसे असणे हे लोकशाहीच्या जिवंतपणाचे लक्षण मानले जाते. मराठा समाजासाठी आरक्षणाचा तीव्रतम लढा देणारे आक्रमक नेते विनायक मेटे यांच्या विचारांशी काही प्रमाणात मतभेद जरूर होते, परंतु, ते सामाजिक पातळीवर एक लढवय्ये नेते होते, ही बाब नाकारता येत नाही. त्यांनी राजकारणात निवडणूका लढविल्या, पक्षांतर केले हे राजकीय वास्तव असले तरी कोणत्याही पक्षात त्यांनी प्रवेश केला अथवा स्वतः स्थापन केलेल्या पक्षाची इतर पक्षांबरोबर युती केली तरी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या भूमिकेशी कुठेच आणि कधीही तडजोड केली नाही. ज्यादिवशी त्यांचा पुणे-मुंब‌ई एक्स्प्रेस वेवर अपघात झाला, त्यावेळी देखील ते मराठा आरक्षणाच्या संदर्भातील बैठकीसाठीच मुंबई ला पोहचत होते; त्याच्या आधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवेचे गोडवे गायले जातात. परंतु, हा रस्ता प्रचंड अपघाताचा आहे, यावर कोणीही गांभीर्याने उपाययोजना करायला तयार नाही. या रस्त्यावर वाहनांच्या वेगाचे आणि लाइनिंगचे नियम आहेत, पण ते वाहनचालक कधीच धाब्यावर बसवतात कळतही नाही. वाहतूक पोलीस यासंदर्भात कठोर आणि थेट कारवाई करित नाही; परिणामी वाहतूक बेशिस्त होत जाते. ज्यात जड वाहनेही लाइट व्हेहीकलच्या रांगेत येऊन धडकतात. वाहतुकीच्या या बेजबाबदार पणाला नेमके कारणीभूत कोण, यावर कोणीही विचार करायला तयार नाही. त्यामुळे, विनायक मेटे यांच्या अपघाताला यंत्रणेचा असा निष्काळजीपणा किंवा बेजबाबदारपणाही जबाबदार आहे, असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही. त्यातच इतका वेगवान रस्ता बनल्यानंतर त्यावर काही अंतरावर ट्राॅमा केअर सेंटर असायला हवी. कोणत्याही इमरजन्सीमध्ये मानवी जीव वाचवण्यासाठी पहिला तास म्हणजे जखमी झाल्यापासून पहिला तास हा गोल्डन अवर म्हणून ओळखला जातो. अपघात झाल्या ठिकाणापासून एक तासापेक्षा कमी वेळेत चांगल्या दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळायला हवेत. देशाचे रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली की, रस्ते अपघातमुक्त करणे, हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अर्थात, गडकरी हे एक क्रियाशील मंत्री आहेत. ते जे बोलतात ते किमान साध्य करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्या आश्वासनामुळे मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे अपघातमुक्त होईल, अशी अपेक्षा करूया. अर्थात, मेटे यांच्यासारखं लढाऊ व्यक्तिमत्त्व गमावल्यानंतर या सर्व उपाययोजनांची तयारी करणं खटकतेच. परंतु, ‘देर झाली तरी अंधेर नाही’, या उक्तीप्रमाणे हेही नसे थोडके, असे मानूया. विनायक मेटे यांचा थेट सक्रिय लढ्याशी संबंध असल्यामुळे त्यांच्या पक्ष-संघटनेत लढाऊ युवकांची एक फौज आहे. ते राजकारणापेक्षाही समाजकारणात अधिक गतिशील होते. त्यामुळे, त्यांच्यावर प्रेम करणारा आणि त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या अपघाती निधनानंतर अनेक संशय व्यक्त केले जात आहेत. परंतु, सर्वात मोठे कारण एक्स्प्रेस वे वरचे नियमबाह्य वाहने चालवणे आणि त्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष असणे, हे कारण अधिक गंभीर आहे. विनायक मेटे या लढाऊ आणि लढवय्या नेतृत्वाच्या अकाली आणि अपघाती निधनामुळे मराठा समाजाच्या सामाजिक न्यायासाठी लढणारे एक नेतृत्व कायमचे दूर गेले, ही बाब मनाला दु:ख देणारी आहे. या लढवय्या नेतृत्वास भावपूर्ण आदरांजली.

COMMENTS