अमरावती : शेतकऱ्यांनी शेतीला लागणारा खर्च आणि वर्षा अखेर शेतीमधून मिळालेले उत्पन्न याचा हिशोब वहिवर लिहून ठेवून लावला तर त्याच्या गुलामगिरीचे उत्तर त
अमरावती : शेतकऱ्यांनी शेतीला लागणारा खर्च आणि वर्षा अखेर शेतीमधून मिळालेले उत्पन्न याचा हिशोब वहिवर लिहून ठेवून लावला तर त्याच्या गुलामगिरीचे उत्तर त्याला मिळेल.
शेतकऱ्यांची गुलामगिरी संपायची असेल तर त्याला संघटित होऊन लढा उभारल्या शिवाय कोणताही पर्याय नाही असे प्रतिपादन अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केले. ते नांदगाव खंडेश्वर येथे आयोजित जिल्हा अधिवेशनानंतर झालेल्या जाहीर सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
सभेचे अध्यक्ष स्थानी माकप चे जेष्ठ कार्यकर्ते कॉ. ज्ञानेश्वर शिंदे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य उपाध्यक्ष प्रा.उदयन शर्मा, उमेश देशमुख उपस्थित होते.यावेळी डॉ.अजित नवले म्हणाले की , मी देशमुख यांची बायोमास ही कादंबरी वाचून शेतकऱ्यांच्या दुःखाचे संपूर्ण दृष्टचक्र समजून घेतले.शेतकऱ्यांना त्याच्या घामाचे दाम मिळत नाही. त्यामुळेच तो कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. शेती पिकवणारा शेतकरी तोट्यात असून शेती धंद्यावर अवलंबून असलेले बी बियाणे उत्पादक, खते, किटकनाशके व इतर शेती उपयोगी अवजारे बनवणारे उत्पादक व कंपन्या नफ्यात आहेत. व्यापारी अडते व संबंधित सर्व नफा कमवत आहेत.महाविकास आघाडी सरकारला उलथवून शिंदे फडणवीस सरकारने आमदारांना सुरत गुहाटीची वारी घडवून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या भावाचा प्रश्न, उत्पादन खर्चावर आधारित भाव, शिक्षण आरोग्य निवारा रोजगाराचे प्रश्न याचा प्रथम विचार करावा जाती-धर्माच्या राजकारणाला बळी पडू नये असे आवाहन डॉ. अजित नवले यांनी केले.लुटारू व धर्मांध शक्तीला विवेक वादाची सर्वाधिक भीती आहे त्यामुळेच नरेंद्र दाभोळकर,कॉम्रेड गोविंद पानसरे,कलबुर्गी, गौरी लंकेश अशा विवेक वादी विचारवंतांच्या हत्या करण्यात आल्या. विज्ञानवादाचा व विवेकवादाचा स्वीकार केल्यानेच शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी व बदल घडू शकतो असे यावेळी डॉक्टर अजित नवले यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कार्यकारणी घठीत करण्यात आली.अध्यक्ष महादेव गारपवार, सचिव श्याम शिंदे, उपाध्यक्ष दिलीप महल्ले, कार्याध्यक्ष देविदास राऊत, कोषाध्यक्ष रमेश सोनुले, सहसचिव अशोक राऊत, सदस्य अनिल मारोटकर, मीरा कुंबरे, संजय वानखडे, प्रफुल निकाळजे, गुणवंत ढोणे यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष देविदास राऊत, मीराताई कुंबरे अशोक राऊत, सुरेश मुरगडे राम गोपाल निमावत, दिलीप महाले, मुकुंद काळे, महादेव गारपवार प्रामुख्याने उपस्थित होते. सूत्रसंचालन राजगुरू शिंदे, यांनी केले तर प्रास्ताविक श्याम शिंदे यांनी केले. अधिवेशनाचे अध्यक्ष मंडळात देविदास राऊत,मीराताई कुंभरे अशोक राऊत यांचा समावेश होता.
COMMENTS