नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशात कोरोना संक्रमणाचा वेग वाढत असून, केंद्र सरकारने कोरोना बुस्टर डोस 18 ते 59 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत केला आहे. त्यामुळ
नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशात कोरोना संक्रमणाचा वेग वाढत असून, केंद्र सरकारने कोरोना बुस्टर डोस 18 ते 59 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत केला आहे. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढत चालले आहे. आतापर्यंत देशभरात सुमारे 200 कोटीहून नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. मात्र 18 जुलैपर्यंत देशातील सुमारे 40 कोटी नागरिकांनी अद्याप कोरोनाचा एकही डोस घेतलेला नसल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात गेल्या तीन दिवसांपासून दररोज 21 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. त्यातच 40 कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी कोरोनाचा एकही डोस न घेतल्यामुळे सरकारसमोरची चिंता वाढतांना दिसून येत आहे. आतापर्यंत एकूण 201 कोटींहून अधिक डोसपैकी 97 टक्के हून अधिक लोकांना सरकारी लसीकरण केंद्रांवर लस मोफत दिली गेली आहे. अलीकडेच केंद्र सरकारने सर्व पात्र प्रौढांना मोफत बूस्टर डोस देण्यासाठी 75 दिवसांची विशेष मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत देशभरात एकूण 6.77 कोटी प्रौढांनी बूस्टर डोस घेतला आहे. या विशेष मोहिमेपूर्वी यावर्षी 16 मार्चपासून सरकारी कोरोना लसीकरण केंद्रांवर आरोग्य कर्मचारी, फ्रंट-लाइन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांना डोस मोफत उपलब्ध होते. 18 जुलैपासून सरकारी लसीकरण केंद्रांवर 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील सर्व लोकांना प्रतिबंधात्मक डोस देण्यासाठी विशेष 75 दिवसांची मोहीम सुरू झाली. कोरोना लसीकरण अमृत महोत्सव या मोहिमेचा उद्देश पात्र लोकांमध्ये कोरोना सावधगिरीच्या डोसचा प्रचार करणे हा आहे.
COMMENTS