अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेच्या कर्मचार्यांमधील कलागुणांचा आविष्कार होऊ पाहत आहे. अहमद नगर महापालिकेतील स्वच्छता निरीक्षक सागर वैरागर हे ’कोण होणा
अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेच्या कर्मचार्यांमधील कलागुणांचा आविष्कार होऊ पाहत आहे. अहमद नगर महापालिकेतील स्वच्छता निरीक्षक सागर वैरागर हे ’कोण होणार करोडपती’ हा मराठी खेळ खेळणार आहेत. येत्या शुक्रवारी 8 जुलैला त्यांच्या खेळाचे प्रक्षेपण होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमावर आधारित मराठीत कोण होणार करोडपती हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर सुरू झाला आहे. अभिनेते सचिन खेडेकर या कार्यक्रमाचे संचालन करतात. यात नगर महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सादर वैरागर सहभागी झाले आहेत. सोनी मराठी वाहिनीवरील ’कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतून स्पर्धक सहभागी होतात. प्रत्येकाचा प्रवास, संघर्ष आणि मिळवलेला विजय वेगळा असतो. आहे ती परिस्थिती स्वीकारून आयुष्यभर तसंच न जगता, पुढे जाण्याचं स्वप्नं बघणारी माणसं यशस्वी होतात. येत्या शुक्रवारच्या 8 जुलैच्या भागात नगर येथील सफाई कामगार ते स्वच्छता निरीक्षक असा प्रेरणादायी प्रवास करणारे सागर वैरागर सहभागी होणार आहेत. सागर वैरागर हे अहमदनगर महापालिकेमध्ये सफाई कामगार होते. सलग 4 वर्षं त्यांनी सफाई कर्मचारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी महापालिकेचा स्वच्छता निरीक्षकाचा अभ्यासक्रम केला. आता ते स्वच्छ भारत अभियानात डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करतात. सफाई कर्मचारी म्हणून काम करीत असताना सकाळी 5.30 वाजता काम सुरू करायचे. सगळ्या रस्त्यांची साफसफाई करणे, त्यानंतर तो कचरा उचलून ट्रकमध्ये भरणे हे त्यांचे काम असायचे. सागर झोपडपट्टीत राहात असल्याने त्यांना त्यांच्या लग्नाच्या वेळीही अनेक अडचणी आल्या. सागर यांनी संसाराची सुरुवात केली, तेव्हा त्यांच्याकडे एक बादली, एक भांडे, एक कुकर व एक गॅस शेगडी एवढ्याच गोष्टी होत्या. इथपासून सुरू झालेला संसार आज स्थिरस्थावर झाला आहे. ’कोण होणार करोडपती’च्या मंचावर आल्यानंतर आता सागर यांचे एकच स्वप्न आहे की, त्यांना स्वतःचं घर घ्यायचे आहे आणि पत्नीबरोबर भारताची सैर करायची आहे. सागर यांचा नशीब या गोष्टीवर खूप विश्वास आहे. ’एक ना एक दिवस मी माझ्या नशिबाच्या जोरावर सगळं बदलून टाकीन आणि कोण होणार करोडपती हा कार्यक्रम त्याची पहिली पायरी आहे’, असे सागर म्हणतात. सफाई कामगार म्हणून सुरू झालेली सागर यांची जीवन कहाणी इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे. शुक्रवारी (8 जुलै) रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती कार्यक्रमात ते दिसणार आहेत.
COMMENTS