अहमदनगर/प्रतिनिधी : जनतेमधून सरपंच निवड प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याची मागणी येथील जय हिंद फाउंडेशनने नव्याने सत्तेवर आलेल्या राज्य सरकारकडे केली आहे
अहमदनगर/प्रतिनिधी : जनतेमधून सरपंच निवड प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याची मागणी येथील जय हिंद फाउंडेशनने नव्याने सत्तेवर आलेल्या राज्य सरकारकडे केली आहे. या मागणीसह जलयुक्त शिवार योजना सुरु करुन राज्यातील सर्व शेतकर्यांचे वीज बिल माफ करण्याच्या मागणीचे हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष माजी सैनिक शिवाजी पालवे यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या सत्ता काळात जनतेमधून सरपंच निवडीचा घेण्यात आलेला महत्त्वाचा निर्णयाला स्थगिती दिली होती. यामुळे गावा-गावात राजकारण, गटबाजी व सरपंच पदासाठी घोडेबाजार उफाळून आला आहे. जनतेतून सरपंचाची निवड झाल्यास या सर्व गोष्टींना लगाम लागणार असून, जनता आपला सरपंच ठरवणार आहे. प्रामाणिकपणे काम करणारा लोकप्रतिनिधी सरपंच म्हणून निवडून आल्यास गावाचा विकास होऊन आदर्श गाव होण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे संघटनेच्यावतीने निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
भाजपच्या सत्ता काळात महाराष्ट्रात 22 हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवून, अनेक गावे पाणीदार केली गेली. परंतु ही योजना बंद पडल्यानंतर अनेक गावे या योजनेपासून वंचित राहिली आहे. ही योजना सुरु करून महाराष्ट्रातील आणखी गावे पाणीदार झाल्यास तेथील शेतकर्यांचा व गावाचा विकास होणार आहे, असा दावा करून निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्यातील शेतकर्यांची थकीत वीज बिले माफ करून शेतकर्यांना मोफत वीज पुरवठा केल्यास शेतकर्यांना न्याय मिळू शकणार आहे. अनेक सरकार स्थापन होत असताना व निवडणुकीमध्ये शेतकर्यांची वीज बिल माफ करण्याची फक्त आश्वासने दिली जातात. या सर्व गोष्टींचा विचार करुन जनतेच्या हितासाठी जनतेमधून सरपंच निवड प्रक्रिया व्हावी, जलयुक्त शिवार योजना सुरु करावी व राज्यातील सर्व शेतकर्यांचे वीज बिल माफ करण्याची मागणी जय हिंद फाउंडेशनने केली आहे.
COMMENTS