महापालिकेच्या हेल्पलाईवर नो रिस्पॉन्स ; कोरोना उपचार सुविधेची नागरिकांना मिळेना माहिती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापालिकेच्या हेल्पलाईवर नो रिस्पॉन्स ; कोरोना उपचार सुविधेची नागरिकांना मिळेना माहिती

पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना पालिकेकडून सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करण्यावर भर दिला जात आहे.

एकविसाव्या शतकात देखील बालविवाह प्रथा सुरूच
उष्माघाताने नव्हे चेंगराचेंगरीमुळे मृत्यू – नाना पटोले
काही सेकंदात चार मजली इमारत कोसळली

पुणे/प्रतिनिधी: पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना पालिकेकडून सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करण्यावर भर दिला जात आहे. तसेच रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असल्याचा दावा महापालिकेकडून येत आहे; मात्र प्रत्यक्षात रुग्णांना वैद्यकीय यंत्रणेसंदर्भात माहिती मिळताना अनेक अडचणींचा सामना करावा  लागत आहे. महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावरून पण प्रतिसाद मिळत नाही. 

पुण्यात मागील एक ते दीड महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा जम्बो रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. तसेच शहरातील खासगी व सरकारी रुग्णालयात कोरोना बाधितांना उपचारासाठी बेड्स उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र प्रत्यक्षात महापालिकेच्या आरोग्य यंत्रणा विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकावरून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. दिवसागणिक वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुणेकरांमध्ये आधीच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात मदत मिळण्यात येत असलेल्या अडचणीत आणखीनच भर पडत आहे. 

वानवडीतील एक 44 वर्षीय महिला कोरोना बाधितव आली. त्यानंतर उपचारासाठी बेड मिळण्यासाठी सातत्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क करण्यात आला उशिरापर्यंत कुठलाही कॉल उचलण्यात आला नाही अशी माहिती कुटुंबीयांकडून मिळाली आहे. तसेच येरवडा येथील 72 वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी होकारात्मक आली. त्यानंतर या महिलेच्या कुटुंबीयांकडून उपचारासाठी बेड मिळावा, म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क केला; मात्र त्यांना शेवटी शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात बेड उपलब्ध झाला. अशाप्रकारे अनेक कोरोना बाधित रुग्णांना उपचार मिळण्यात अडचण येत असल्याने अपडेट वैद्यकीय यंत्रणा मिळणेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पुणे शहरातील नागरिकांना कोरोना विषयी वैद्यकीय यंत्रणेची माहिती मिळण्यासाठी 020-25502110/6/7/8/9 हे हेल्पलाईन क्रमांक मागील वर्षांपासून अस्तित्वात आहे; मात्र गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा महापालिकेचे हे हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क करण्यात अडचण येत आहे तसेच बर्‍याचवेळा रिंग वाजते; पण कुणी उचलत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, की कोरोना रुग्णांच्या उपचारासंबंधी माहिती देण्याची सुविधा 24 तास सुरू असून साधारण चार सत्रांत काम चालते. अशावेळी रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध करून देण्याचाच आमचा प्रयत्न असतो; मात्र या महिन्यात दिवसाला जवळपास 450 कॉल वाढले आहेत. त्यामुळे कुणीच हेल्पलाईन क्रमांकावर प्रतिसाद दिला नाही असे होणे शक्य नाही. डॉ. जीवन चौधरी म्हणाले, की हेल्पलाईन क्रमांकाबाबत बाबत काही तांत्रिक अडचणी असू शकतात; मात्र सध्याच्या घडीला सर्व रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असून रुग्णांनी पूर्ण भरले आहेत. त्यामुळे येणार्‍या कॉलपैकी 60 टक्के रुग्णांना बेड पुरविण्यात येत आहे. 

तांत्रिक समस्या दूर करू

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर उपचार व बेड संदर्भात माहिती मिळण्याबाबत अडचण येत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे हेल्पलाईन क्रमांकासंबंधीची तांत्रिक समस्या दूर करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र पाठविले आहे. लवकरात लवकर ही अडचण दूर करून आणि नागरिकांना विना तक्रार हेल्पलाईन क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती डॉ.अंजली साबणे यांनी दिली.

COMMENTS