ठाकरेंच्या समर्थनार्थ जिल्हा शिवसेनेचा उद्या नगरला मेळावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरेंच्या समर्थनार्थ जिल्हा शिवसेनेचा उद्या नगरला मेळावा

नगर शहरातील उपस्थिती तसेच शिंदेंवर होणार्‍या टीकेची उत्सुकता

अहमदनगर/प्रतिनिधी : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी नगर दक्षिण जिल्हा शिवसेनेने उद्या मंगळवारी (28 जून) दुपारी साडेबारा वाजता

आणखी एक बडा सावकार कर्जत पोलिसांच्या जाळ्यात
नगर अर्बन बँक निवडणुकीत राजकीय एन्ट्रीला सुरुवात
पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज फेटाळला, कारागृहातच राहणार मुक्काम

अहमदनगर/प्रतिनिधी : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी नगर दक्षिण जिल्हा शिवसेनेने उद्या मंगळवारी (28 जून) दुपारी साडेबारा वाजता बुरुडगाव रोडवरील नक्षत्र लॉनमध्ये शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास नगर शहरातून पक्षाचे कोण नगरसेवक उपस्थित राहतात तसेच या मेळाव्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीकाटिपणी होते की नाही, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

राज्यभरामध्ये शिवसेनेतील ठाकरे-शिंदे वादाची जोरदार चर्चा आहे. राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये यावरून दोन गट पडण्याच्या मार्गावर आहेत. नगर शहर व जिल्ह्यात शिवसेनेचा स्वतंत्र आमदार नाही. नेवाशाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी शिवबंधन बांधून सेनेत प्रवेश केला आहे व त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर नगर दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे व नगर शहर प्रमुख संभाजी कदम यांनी पक्ष प्रमुख ठाकरेंना समर्थन देताना शिवसेनेच्या मुंबईतील मातोश्री या ठाकरे यांच्या निवासस्थानावरून येणार्‍या आदेशाचे पालन करण्याचे जाहीर केले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील दोन दिवसात घेतलेल्या ऑनलाईन बैठकांनाही शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांनी उपस्थिती लावली आहे. या पार्श्‍वभूमीवर दक्षिण नगर जिल्ह्यातील नगर शहर, पारनेर, कर्जत, जामखेड, राहुरी, पाथर्डी, शेवगाव व श्रीगोंदे या तालुक्यांतील शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, गट प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शहर प्रमुख, तालुका प्रमुख, युवा सेना प्रमुख, महिला आघाडी, कामगार सेना पदाधिकारी व सदस्यांचा मेळावा उद्या मंगळवारी (28 जून) नगरला होणार आहे. दरम्यान, बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मानणारे नगर शहरात काही नगरसेवक असून, त्यांची उद्या होणार्‍या मेळाव्यात उपस्थिती असेल की नाही तसेच या मेळाव्यात मंत्री शिंदेंबद्दल कोण काय भाष्य करते, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.

COMMENTS