कोरोनाने दररोज होणार एक हजार मृत्यू ; आरोग्य विभागाचा इशारा; पुढील दोन आठवडे जास्त धोक्याचे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाने दररोज होणार एक हजार मृत्यू ; आरोग्य विभागाचा इशारा; पुढील दोन आठवडे जास्त धोक्याचे

राज्यात आतापर्यंत सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद झाली.

दुष्काळ सदृश्य परिस्तिथीमुळे आ.आजबेंचा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा
आतापर्यंत धरली तग, यापुढे जगायचे कसे? ; रेस्टॉरंट चालकांचा प्रशासनाला सवाल
ब्राह्मणगाव केंद्राकडून गोल्डन कार्ड काढण्याचे काम सुरू

मुंबई/प्रतिनिधीः राज्यात आतापर्यंत सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता पुढील दोन आठवडे अधिक धोक्याचे असणार आहेत. या कालावधीत अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांपर्यंत पोहोचेल, तर दिवसाला एक हजार मृत्यू होतील, असा धोक्याचा इशारा राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे. दरम्यान, देशात कोरोनाची दुसरी तीव्र लाट आली असून पुढच्या शंभर दिवसांत काळजी घ्यावी लागेल, असे स्टेट बँकेच्या अहवालात म्हटले आहे. बुधवारी राज्यात तब्बल 31 हजार 855 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत दिवसातील ही सर्वाधिक उच्चांक संख्या आहे. 

राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 25 लाख 64 हजार 881 वर पोहोचली आहे. बुधवारी 95 रुग्णांच्या मृत्यूसह बळींचा आकडा 53 हजार 684 झाला आहे. सध्या दोन लाख 47 हजार 299  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 61 हजार 125 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ नागपुरात 47 हजार 707 आणि मुंबईत 32 हजार 927 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. चार एप्रिलपर्यंत राज्यात कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसेस तीन लाखांपर्यंत पोहोचतील. शिवाय मृत्यूचा आकडाही पुढील 11 दिवसांत 64 हजारांवर पोहोचेल असा इशारा महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिला आहे. आठवड्याला संसर्गाचे प्रमाण एक टक्क्याने वाढत आहे. सध्या असलेला 2.27 टक्के मृत्यूदर लक्षात घेता एकूण 28लाख 24 हजार 382 रुग्णसंख्येच्या 64 हजार 613 मृत्यू होण्याची शक्यता आहे. पुढील दोन आठवड्यात दिवसाला एक हजार मृत्यूची शक्यता विभागाने वर्तवली आहे. सध्या राज्यात  41 टक्क्यांपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहे. त्यापैकी आठ टक्के गंभीर आहेत आणि 0.71 टक्के व्हेंटिलेटरवर आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये उपचाराच्या योग्य सुविधा नाहीत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार पुरेशा प्रमाणात नॉन ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर आहेत; पण जवळपास चार हजारांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेडची गरज आहे. नागपूर आणि ठाण्याने जर त्यांच्या सुविधा वाढवल्या नाहीत, तर रुग्ण वाढ आणि मृत्यूबाबतील या दोन्ही जिल्ह्यांची परिस्थिती खूपच गंभीर होईल. स्टेट बँकेच्या रिसर्च टीमने तयार केलेल्या अहवालात कोरोनाची दुसरी लाट जवळपास शंभर दिवस भारतात राहील. त्यामुळे 15 फेब्रुवारी ही तारीख गृहित धरली तर मे पर्यंत या लाटेचा परिणाम पाहायला मिळू शकते. या अहवालानुसार एप्रिल- मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट जोरदार असणार आहे. 23 मार्चच्या कोरोना ट्रेन्डचा विचार करायचा झाला, तर देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 25 लाखापेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त होऊ शकतात. अहवालानुसार, स्थानिक स्तरावर टाळेबंदीच्या निर्बंधांचा कुठलाही परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे लसीकरणावर भर आणि त्याचा वेग वाढवणे गरजेचे असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक बाबींचा विचार करायचा झाला, तर गेल्या आठवड्यापासूनच इंडेक्समध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. काही राज्यात कडक टाळेबंदीच्या निर्णयाचे परिणाम पुढील महिन्यात दिसून येतील, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

लसीकरणाचा वेग वाढवा

सध्या रोज 34 लाख लोकांना लस दिली जात आहे. हा वेग 40 ते 45 लाखांवर घेऊन गेल्यास पुढील तीन-चार महिन्यांत 45 वर्षांवरील सर्वांना लस टोचली जाऊ शकते. कोरोनाची दुसरी लाट वेळेपूर्वी आल्याचे आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी सांगितले. आपल्याला अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. चाचण्यांची संख्या वाढवणे, मुखपट्टी वापरणे, सोबतच लसीकरण मोहीम लवकर पूर्ण करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. 

लोकसंख्येच्या प्रमाणात कमी लसीकरण

पंजाब, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगालसह अधिक वृद्धांची संख्या असलेल्या राज्यांनी आपल्या लोकसंख्येच्या कमी प्रमाणात लसीकरण केले आहे. लसीकरणाची गती वाढवणे गरजेचे असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

COMMENTS