सत्तेच्या ऐरणीवर निर्णायक घाव कुणाचा !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

सत्तेच्या ऐरणीवर निर्णायक घाव कुणाचा !

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर यापूर्वी दीर्घकाळ पर्यंत लिहीण्याची वेळ यापूर्वी कधी आली नव्हती.‌राजकीय संघर्ष झाले, परंतु, ते रेंगाळले नाहीत. एकनाथ श

kopargav:विकासाचे अनुत्तरीत प्रश मार्गी लावणे माझे आद्य कर्तव्यच : आ. आशुतोष काळे| LokNews24
टीडीएफ माध्यमिक शिक्षक संघाच्या सभेत एकजुटीचा नारा
टंचाईचे ढग दाटले; लातूर जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणी आता पिण्यासाठी आरक्षित !

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर यापूर्वी दीर्घकाळ पर्यंत लिहीण्याची वेळ यापूर्वी कधी आली नव्हती.‌राजकीय संघर्ष झाले, परंतु, ते रेंगाळले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राजकीय सत्ताबंड मात्र रेंगाळत असल्याने यात महाविकास आघाडी सरकार च्या बाजूने जमेच्या बाजू वाढत आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिले दोन दिवस गोंधळलेले होते. मात्र, या बंडखोरी विरोधात निर्णायक लढा दिल्याशिवाय पक्ष वाचविण्याचे आव्हान पेलता येऊ शकत नाही, हे त्यांनी पूर्णपणे ओळखले. त्यातूनच त्यांची आक्रमकता अधिक स्पष्ट झाली. बंडखोरी करणाऱ्या आमदारांमध्ये सर्वाधिक संख्या शिवसेना आमदारांची असली तरी, यात बहुपक्षीय आमदारांचा समावेश असल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याचे दिसत असले तरी ज्या तात्काळ पध्दतीने ऍक्शन कार्यक्रम व्हायला हवा होता, ते शक्य होऊ शकलं नाही. नाही म्हणायला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही सक्रियता कालपासून वाढल्याचे संकेत दिसत आहेत. त्यातच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आजारातून सावरल्याने त्यांची सक्रियता देखील ठळक झाली आहे. त्याचा पहिला भाग म्हणून त्यांनी बंडखोर आमदारांच्या घराला आणि कुटूंबाला संरक्षण पुरवण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपल्या सक्रियतेची सुरूवात केली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या भूमिका बऱ्याच अंशी काम करणार आहेत. अर्थात, या दोन्ही व्यक्ती संवैधानिक पदावर असल्याने त्यांना कोणतीही भूमिका संविधानाबरहुकूम घ्यावी लागेल. यापैकी कोणत्याही व्यक्तीला संविधानाची मोडतोड करता येणार नाही; कारण सत्तासंघर्ष अशा दोन गटात होतोय ज्यांना सत्तेचा दीर्घ अनुभव आहे.‌त्यामुळे संवैधानिक पदांवरील दोन्ही व्यक्तींना मनमानी करता येणार नाही. त्यांना संविधानाच्या मार्गदर्शनाने कोणताही निर्णय घ्यावा लागेल! संवैधानिक तांत्रिकता फार मोलाची ठरत आहे किंवा ठरणार आहे. तरीही, एक बाब आता दृष्टीपथात जी येत आहे, त्यात वर्तमान महाविकास आघाडी सरकार या संकटातून तरूण जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे! एकमात्र खरे की, शिवसेना आमदारांच्या बंडखोरी विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरतो आहे, त्याचवेळी १४४ कलम लागू करण्यात आले आहे, त्याचवेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मेळावे ठिकठिकाणी होत आहेत.‌ यासर्व बाबी परस्परविरोधी वाटत आहेत. अशा वातावरणात सर्वच घडामोडींची समिक्षा होत राहणार आहे. समिक्षा, संघर्ष, वादविवाद, बंडखोरी, सत्ता आणि सत्तासंघर्ष अशा सर्वच बाबी काळाच्या ओघात घडत राहतात. मात्र, यात संविधानाच्या गरिमाला धक्का लागायला नको, याची काळजी सर्वपक्षीयांनी घेतली पाहिजे, किंबहुना, त्यांनी ती घेतलीच पाहिजे. सत्ता येते आणि जाते, सत्ताधारी देखील येतात आणि जातात; परंतु, संविधानाच्या तत्त्वाला धक्का लागता कामा नये. लोकशाही प्रक्रिया आणि तिचा मुलभूत आधार संविधान आहे. सध्याची महाविकास आघाडी आणि सध्याचे बंडखोर आमदार आणि राज्याचा विरोधी पक्ष आणि या सर्वपक्षीय नेते यांना या बाबींचे गांभीर्याने समजून घ्यावे लागेल! सोमवारपासून नवा आठवडा सुरू होत आहे. हा आठवडा महाविकास आघाडी ची सत्ता टिकणे, बंडखोर आमदारांचे बंड यशस्वी होणे, सत्ताबदल की राष्ट्रपती राजवट या महत्वाच्या गोष्टी या आठवड्यात स्पष्ट होईल. परंतु, एकंदरीत परिस्थिती ज्या पद्धतीने वाटचाल करीत आहे त्यातून असाच अर्थ निघतो आहे की, राज्यातील वर्तमान महाविकास आघाडी सरकार या संकटातून तरेल, अशीच शक्यता अधिक दिसते आहे. तरीही, शेवटी हा परिस्थितीजन्य अंदाज आहे. त्यात बदल घडू शकतात, कदाचित, धक्कादायक बदलही घडून येवू शकतात. तूर्तास, आपण वाट पाहूया! ऐरणीवर आलेल्या सत्तासंघर्षावर कोण यशस्वी हातोडा घालतो, हे पहावे लागेल!

COMMENTS