महापालिकेने नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले आहे.
पुणे/प्रतिनिधीः महापालिकेने नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले आहे. आतापर्यंत तीन लाख नागरिकांचे लसीकरण झाले असून 33 हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या ताब्यात पुढील दोन दिवस पुरेल इतक्याच लसी उपलब्ध असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरण वेग वाढवणे गरजेचे आहे. राज्य सरकरकडून आता 55 हजार लसी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यापैकी सद्यस्थितीत फक्त 44 हजार डोस महापालिकेकडे शिल्लक आहेत. हा साठा दोन दिवस पुरेल असे अधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे आता महापालिकेला लस पुरत नसल्याची स्थिती आहे. तीन टप्प्यात लसीकरण मोहीम सुरू झाली होती. आता एक एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. विविध स्तरावरून राज्य सरकारकडे लसींची मागणी केली जात आहे. ज्या ठिकणी सर्वाधिक संसर्ग वाढत आहे, अशा ठिकाणीच लसी उपलब्ध करून द्यायला पाहिजेत, अशी मागणी होऊनही सरकार दिवस वाढवताना दिसत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत प्रमुख शहरांना लसी पुरवल्या पाहिजेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. आताच अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर पुढील काळात लसीकरण हे महापालिकेसमोरील आव्हान ठरणार आहे. आताच्या परिस्थितीत लसीकरणाचा वेग गेल्या चार दिवसांत 15 हजारांच्या घरात पोहोचला आहे. पुण्यातील वाढता संसर्ग पाहता लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. लसीकरण केंद्रासह लाभार्थ्यांची संख्या वाढल्याने लसींचा तुटवडा भासत आहे. आता राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दोन एप्रिलला लसींचा पुढचा साठा मिळेल असे सांगितले आहे. त्यामुळे इथून लसीकरण कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे आरोग्य विभागातील एका अधिकार्याने सांगितले.
COMMENTS