हायहोल्टेज ड्रामा आणि भाजपचा विजय

Homeताज्या बातम्यासंपादकीय

हायहोल्टेज ड्रामा आणि भाजपचा विजय

महाराष्ट्रात आतापर्यंत राज्यसभेच्या निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत. मात्र बर्‍याच वर्षानंतर राज्यात राज्यसभेची निवडणूक झाली. नुसती निवडणूक झालीच नाही,

मराठीचा ‘अभिजात’ दर्जा कुठे अडकला ?
अमलीपदार्थांचा वाढता वापर
राज्यात पुन्हा राजकीय धुरळा

महाराष्ट्रात आतापर्यंत राज्यसभेच्या निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत. मात्र बर्‍याच वर्षानंतर राज्यात राज्यसभेची निवडणूक झाली. नुसती निवडणूक झालीच नाही, तर हायहोल्टेज ड्रामाने या निवडणूकीत खर्‍या अर्थाने रंगत आणली होती. अपक्षांचा पाठिंबा आणि यशस्वी डावपेचांच्या जोरावर भाजपने मैदान मारत शिवसेनेच्या उमेदवाराला अस्मान दाखवले.
वास्तविक पाहता भाजपचे 106 आमदार विधानसभेत आहेत. तर महाविकास आघाडीच्या पक्षांचे संख्याबळ 152 आमदार आहेत. तसेच विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी आघाडीला 170 आमदारांचा पाठिंबा होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे 4 उमेदवार विजयी व्हायला पाहिजे होते. मात्र अपक्ष आमदार आणि छोटया पक्षांचा विचार करता, त्यांनी भाजपला साथ दिल्यामुळे शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाला. विशेष म्हणजे शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेत, आपले विशेष दूत अपक्ष आणि छोटया पक्षाचे आमदार गळाला लावण्यासाठी पाठवले होते. त्यातील अनेक अपक्ष आमदार आणि छोटया पक्षांनी शिवसेनेला मतदान करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे शिवसेना निश्‍चित होती. तर दुसरीकडे फडणवीस यांनी राजकीय गणित करूनच आपला तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला होता. तिसरा उमेदवार नुसता रिंगणात उतरवलाच नाही, तर त्यांनी अपक्ष आमदारांची आणि छोटया पक्षांची मोट बांधत विजय खेचून आणला. माध्यमांना प्रतिक्रिया देतांना फडणवीस म्हणाले होते की, माध्यमांना रणनीती सांगायची नसते. त्यांच्या या वक्तव्यानंतरच भाजप आपला उमेदवार विजयी करण्यासाठी विशेष रणनीती आखत असल्याचे यानिमित्ताने समोर आले होते. पहिल्या पाच जागांचा निकाल अपेक्षेप्रणाणेच लागला. शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंड हे पाच उमेदवार विजयी झाले. परंतु सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात चांगलीच चुरशी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांना महाविकास आघाडीची 9 ते 10 मते मिळवण्यात यश आले. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात चुरशीची लढत निर्माण झाली होती. परंतु दुसर्‍या पसंतीची मतांच्या आधारावर धनंजय महाडिकांनी बाजी मारली. मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली. त्यामुळे भाजपचा विजय सोपा झाला. मात्र यानिमित्ताने भाजपची रणनीती आणि त्यांनी आखलेले डावपेच, फडणवीस यांना दुसर्‍यांदा कोरोनाची लागण झाल्यानंतर देखील त्यांनी हॉस्पिटलमधून हलवलेली सुत्रे यामुळे भाजपचा विजय झाला असून, शिवसेना पराभूत झाली आहे.

विधानपरिषद निवडणुकीत काय होणार ?
राज्यसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला मात देत आपला उमेदवार विजयी केला. मात्र पुढील काही दिवसांत विधानपरिषदेची 10 जागासाठी निवडणूक होत आहे. या दहा जागापैकी भाजपने 5 उमेदवारांची घोषणा केली असून, सहावा अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांना भाजपपुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आहे. संख्याबळाचा विचार करता, या निवडणुकीत भाजप सहजपणे 4 उमेदवार विजयी करू शकतो. मात्र भाजपने 5 वा उमेदवार देत निवडणूकीमध्ये रंगत आणली आहे. शिवाय सहावा उमेदवार दिल्यामुळे या निवडणुकीचे निकाल काय लागेल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली नाही, आणि आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला, तर भाजपचा विश्‍वास नक्कीच उंचावलेला असेल. तसेच विधानपरिषदेच्या निवडणूकीत ही हायहोल्टेज ड्रामा बघायला मिळू शकतो. शिवसेना नेते संजय राऊत आम्हाला सहा अपक्ष आमदारांनी धोका दिला, घोडेबाजार झाला, अपक्ष आमदारांनी शब्द फिरवला म्हणत असले तरी, राजकारणात याला विशेष असे महत्व नसते. निवडणुकीमध्ये विजयाला महत्व असते, आणि भाजपने आपले उमेदवार विजयी करत, ही किमया साधली आहे.

COMMENTS