मुंबई : बालमजुरीसारखी समाजविघातक अनिष्ट प्रथा संपविण्यासाठी राज्यातील जागृत जनतेने एकत्र येऊन महाराष्ट्रातून बालमजुरी नष्ट करावी. असे आवाहन, कामगार म
मुंबई : बालमजुरीसारखी समाजविघातक अनिष्ट प्रथा संपविण्यासाठी राज्यातील जागृत जनतेने एकत्र येऊन महाराष्ट्रातून बालमजुरी नष्ट करावी. असे आवाहन, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिनानिमित्त राज्यातील जनतेला केले आहे.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यभरातील 14 वर्षाखालील लहान मुले शाळेत न जाता कुठे काम करताना आढळल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ नजीकच्या कामगार आयुक्त कार्यालय अथवा हेल्पलाईन क्र. 1098 वर कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. 14 वर्षांखालील सर्व मुलांना घटनेने शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला आहे. याकरिता राज्यात 14 वर्षांखालील गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. सर्व लहान मुलांनी शाळेत शिकून स्वत:चे व देशाचे भविष्य उज्ज्वल करावे, ही त्यामागील भूमिका आहे. असे असतानाही काही समाजकंटक या कोवळ्या जीवांना बेकायदेशीरपणे स्वत:च्या स्वार्थाकरिता कामावर ठेवून त्यांचे शोषण करतात. या कुप्रथेविरोधात सर्वांनी एकत्र यायला हवे. नागरिकांनी सजगता दाखवून अशा समाजकंटकांची माहिती शासन यंत्रणेस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. अशा समाजकंटकांविरुद्ध खात्रीशीर कारवाई करण्यात येईल, तसेच पिळवणूकग्रस्त बालकास पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
COMMENTS