जवखेडे तिहेरी हत्याकांड प्रकरणातील तिन्ही आरोपी निर्दोष

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जवखेडे तिहेरी हत्याकांड प्रकरणातील तिन्ही आरोपी निर्दोष

राज्यभर गाजलेल्या अहमदनगर येथील खटल्याचा निकाल

अहमदनगर/प्रतिनिधी : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथे आठ वर्षांपूर्वी झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव आणि दिलीप ज

कोल्हापूर ते दिल्ली गाजवणारे Pt. नारायणराव व्यास | Kolhapur | LokNews24
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे एन.एम.एम.एस. परीक्षेत यश
गावातील कीर्तनकारांच्या सेवेने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

अहमदनगर/प्रतिनिधी : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथे आठ वर्षांपूर्वी झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव आणि दिलीप जगन्नाथ जाधव या तिन्ही आरोपींची प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी मंगळवारी निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्ष गुन्हा सिद्ध न करू शकल्यामुळे आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याचे आरोपींचे वकील सुनील मगरे यांनी सांगितले.
21 ऑक्टोबर 2014 रोजी जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथे संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव व सुनील संजय जाधव या एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मृत संजय जाधव यांचा पुतण्या प्रशांत दिलीप जाधव याने पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे तिहेरी हत्याकांड जवखेडे खालसा गावातील उच्चवर्णीय लोकांनी घडवून आणल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. त्यानंतर गुन्ह्यात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक अधिनियमाचे कलम वाढविण्यात आले होते.
एकाच दलित कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने संपूर्ण राज्य हादरले होते. या प्रकरणात गृह मंत्रालयाने विशेष लक्ष घातले. पोलिस प्रशासनाने विशेष पथकामार्फत आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाची व्याप्ती पाहून विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. ते तब्बल दीड महिने घटनास्थळ व पाथर्डी येथे तळ ठोकून होते. या पथकाने या तिहेरी हत्याकांडचा कसून तपास केला. संशयित व काही स्थानिक नागरिकांच्या नार्को व इतर मानसशास्त्रीय चाचण्या केल्यानंतर मृत जाधव कुटुंबीयांच्या घरातीलच प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव आणि दिलीप जगन्नाथ जाधव यांनी खून केल्याचे निष्पन्न करण्यात आले होते. त्यावरून या गुन्ह्यात आरोपी प्रशांत दिलीप जाधव यास 3 डिसेंबर 2014 रोजी, अशोक दिलीप जाधव यास 7 डिसेंबर 2014 रोजी व आरोपी दिलीप जाधव यास दिनांक 18 डिसेंबर 2014 रोजी अटक करण्यात आली होती.
तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक शाशिराज पाटोळे यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. शासनाने अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे एकूण 54 साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी मंगळवारी अंतिम निकाल जाहीर केला. यात तिन्ही आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. निकालाबाबत समाधानी असल्याचे आरोपींचे वकील मगरे यांनी सांगितले.

उच्च न्यायालयात अपिलाचे प्रयत्न : यादव
या खटल्यात सरकार पक्षाने अत्यंत भक्कमपणे सक्षम पुराव्यांची मांडणी न्यायालयात केली होती. त्यामुळे न्यायालयाचा सविस्तर निकाल प्राप्त झाल्यानंतर कोणते मुद्दे विचारात घेतले अथवा घेतले नाहीत, याबाबत माहिती घेतली जाईल. याप्रकरणी उच्च न्यायालयात अपील करण्यासंदर्भात शासनाकडे विनंती केली जाईल व तसा अहवाल पाठविला जाईल, अशी प्रतिक्रिया सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी निकालानंतर दिली.

COMMENTS