डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती आज संपूर्ण देशात साजरी केली जात आहे; एवढेच नव्हे तर विदेशात देखील आता मोठ्या प्रमाणात साजरी होऊ लागली आह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती आज संपूर्ण देशात साजरी केली जात आहे; एवढेच नव्हे तर विदेशात देखील आता मोठ्या प्रमाणात साजरी होऊ लागली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार हा समस्त मानव समाजाच्या कल्याणाचा विचार आहे; त्यामुळे हा विचार देश, प्रांत याच्या सर्व भौगोलिक सीमा पार करून तो जगामध्ये प्रसार पावणारा विचार आहे. हजारों वर्षांनंतर युगप्रवर्तक घडतो, जो मानवी समाजजीवनात सर्वंकष परिवर्तन घडवून आणतो असे सर्वंकश वैचारिक परिवर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी केवळ भारतीय समाजात असूनही तरी या विश्वातील सर्व दबलेल्या, पिचलेल्या, गांजलेल्या, साधनवंचित असलेल्या मानवी समाजाच्या उत्थानाचा विचार असल्याने हा विचार सर्व भौगोलिक सीमांना भेदून जगात प्रसारीत पावला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाच्या परिवर्तन घडविणाऱ्या महापुरुषांना आपल्या गुरुस्थानी मानले. त्यात तथागत बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले आणि संत कबीर या तीन युगप्रवर्तक महापुरुषांना त्यांनी आपल्या जीवनात सर्वोच्च स्थान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार हा किंवा सिद्धांत हा केवळ वाचनासाठी नसून तो कृतीत किंवा अमलात आणण्यासाठीचा सिद्धांत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मूलतः अर्थशास्त्रज्ञ होते. अर्थशास्त्रावर त्यांनी एकूण तीन ग्रंथांची निर्मिती केली. परंतु, त्यांच्या जीवनात वैचारिक लेखनाला सुरुवात कोलंबिया विद्यापीठात त्यांनी मांडलेल्या जातीव्यवस्थावरील शोध प्रबंधापासून होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम भारतीय समाजात जी विषमता आहे, त्या विषमतेचे मूळ कारण ही जातीव्यवस्था आहे, हे निक्षून सांगितले. ते केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर या जातीव्यवस्थेतून बाहेर येण्यासाठी अन्य दुसरा कोणताही मार्ग नसून, ज्या जातिव्यवस्थेच्या क्रमिक असमानतेमुळे. भारतातील मानवी समाजाचे उत्थान पूर्णपणे वृद्ध झाले आहे त्या जातीव्यवस्थेला मुळापासूनच नष्ट करावे लागेल, हा उपाय देखील त्यांनी त्या शोधप्रबंधातच मांडला आहे.देशाच्या सामाजिक-राजकीय क्षितिजावर त्यांचा उदय इ.स. १९२० च्या दशकात झाला. समाजाच्या, अस्पृश्य म्हणून हिणविल्या गेलेल्या अगदी तळातील वर्गाच्या पुनरुत्थानासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक पातळीवर तेव्हापासूनच त्यांचा संघर्ष सुरू होता. बाबासाहेब एक थोर विचारवंत होते आणि त्यांनी अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विधिज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, संसद सदस्य आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन समाजसुधारक आणि मानवाधिकारांचा रक्षक या नात्याने केलेले कार्य अतुलनीय आहे. देशभरातील अस्पृश्य समाजाला एकवटून, संघटित करून सामाजिक समतेच्या ध्येयाप्रत जाण्याच्या दृष्टीने राजकीय मार्ग कसा अवलंबायचा, याविषयी त्यांनी दिशादर्शन केले. १९२६ ग्रामीण भागातील गरिबांच्या समस्यांविषयीचे त्यांचे समग्र आकलन त्यांनी उभारलेल्या जनआंदोलनांमध्ये प्रतिबिंबित होते. शेतीमधील खोती पद्धतीविरुद्ध त्यांनी केलेल्या यशस्वी आंदोलनामुळे अनेक ग्रामीण गरिबांची आर्थिक शोषणातून मुक्तता झाली. मानवी अधिकारांचे मूलतत्त्व म्हणून त्यांनी लोकशाही राज्यव्यवस्थेचा ताकदीने पुरस्कार आणि पाठपुरावा केला. समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या तीन लोकशाही तत्त्वांचा केवळ राजकीय हक्क असा संकुचित अर्थ लावला जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचे ते खंदे पुरस्कर्ते होते आणि सामाजिक-आर्थिक लोकशाहीकडे दुर्लक्षून राजकीय लोकशाही टिकू शकणार नाही, असा इशाराही द्यायला ते विसरले नाहीत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ दि स्टेट पॉलिसी हा अनुच्छेद घटनेत समाविष्ट करून त्यांनी आर्थिक लोकशाहीचा हेतू विषद केला. अशा या द्रष्ट्या युगप्रवर्तकास विनम्र अभिवादन.
COMMENTS