Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदबिबी महालच्या परिसरात पुन्हा आढळला बिबट्याचा वावर

नगर-पाथर्डी रस्त्यावरील चांदबिबी महालाच्या परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर आढळला आहे.

अहिल्यादेवी होळकर मिरवणूक नगर शहरात ठरली आकर्षण 
 मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लोटे यांच्यावर प्राणघातक हल्ला
जुनी पेन्शन साठी क्रांतीची ज्योत पेटवा – प्रा किसन चव्हाण

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-पाथर्डी रस्त्यावरील चांदबिबी महालाच्या परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर आढळला आहे. त्यामुळे या महालावर व्यायामासाठी व फिरण्यासाठी जाणारांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

गेल्या काही महिन्यांपूर्वी महालाच्या परिसरात दोन बिबटे दिसत असल्याने या भागात भीतीचे वातावरण होते. वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे, व्याघ्र संरक्षण प्राधिकरणचे सदस्य व निसर्गमित्र मंदार साबळे आणि वनविभागाची पूर्ण टीम त्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होती. महाल परिसरात पर्यटकांना फिरण्यास काही काळ मनाई करण्यात आली होती. गेल्या दोन ते तीन महिन्यात इथे पुन्हा बिबट्या दिसला नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता.  मात्र, मंगळवारी (30 मार्च) सकाळी महालाच्या रस्त्यावर पुन्हा काहीजणांना बिबट्या दिसला. या भागात फिरायला जाणारे नगरमधील सुनील माळवदे यांच्या गाडीला बिबट्या आडवा पळल्याने त्यांनी तात्काळ याबाबत मंदार साबळे यांना कळवले. साबळे यांनी जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांना याबाबत माहिती दिली. बिबट्याचा या भागात वावर असला तरी त्याचा उपद्रव मात्र नाही. तरीही या भागात फिरायला जाणार्‍या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन सुनील थेटे व मंदार साबळे यांनी केले आहे. सध्या उन्हाळ्यामुळे गवत वाळलेले असून पानगळही झालेली आहे. त्यात बिबट्याचा रंग या परिसराशी खूप मिळताजुळता असल्याने झाडीत लपलेला असला तर तो चटकन नजरेस पडत नाही. त्यामुळे आडवाटेला कोणी जाऊ नये, असे साबळे यांनी सांगितले.

COMMENTS