सातारा : जिल्ह्यातील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यासह आणखी तीन कारखान्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. यामध्ये रयत-अथनी शुगर (कराड),
सातारा : जिल्ह्यातील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यासह आणखी तीन कारखान्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. यामध्ये रयत-अथनी शुगर (कराड), लोकनेते बाळासाहेब देसाई (पाटण) व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना (शेंद्रे) यांचा समावेश आहे. त्यापैकी पाटणचा कारखाना हा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे, तर अजिंक्यतारा कारखाना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आहे. ‘रयत’ हा काँग्रेसचे नेते अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या गटाचा आहे. त्यामुळे हे तीनही कारखाने बिनविरोध होण्यासाठी या नेत्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. सातारा जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांची निवडणूक होत आहे. त्यामध्ये किसन वीर सहकारी साखर कारखान्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम सुरू आहे.
या कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार, दि. 28 पासून सुरू झाली आहे. या निवडणुकीत वाईचे आ. मकरंद पाटील यांनी पॅनेल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कारखान्याचे माजी अध्यक्ष मदन भोसले यांचे पॅनेलही रिंगणात असणार आहे. त्यासोबतच आता शिवसेनाही निवडणुकीच्या प्रक्रियेत असून त्यांनी काही मुद्द्यांवर समविचारींना पाठिंबा देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिकाही लवकरच समजणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येत्या एक एप्रिलपासून जिल्ह्यातील आणखी तीन कारखान्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामध्ये रयत-अथणी शुगर, लोकनेते बाळासाहेब पाटील सहकारी साखर कारखाना आणि अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. त्यातील अजिंक्यतारा कारखान्याची निवडणूक आत्तापर्यंत बिनविरोध होत आली आहे. यावेळेसही तो बिनविरोध होण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून प्रयत्न होणार आहेत. रयत अथणी शुगरचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आहेत. मागील वेळी या कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. आता यावेळेसही बिनविरोध करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची निवडणूक यापूर्वी बिनविरोध झाली नव्हती. मागील वेळी सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सभासदांचे पॅनेल टाकले होते. पण, ते स्वत: निवडणूक रिंगणात नव्हते. त्यापूर्वीच्या निवडणुकीत मात्र, पाटणकर स्वत: निवडणुकीत सहभागी झाले होते. मागील निवडणुकीत त्यांच्या पॅनेलला यश मिळाले नाही. उलट गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व जागा चांगल्या फरकाने जिंकल्या होत्या. त्यामुळे यावेळेस पुन्हा सत्यजितसिंह पाटणकर पॅनेल टाकणार काय, याची उत्सुकता आहे. गृहराज्यमंत्री देसाई हे यावेळेस निवडणूक बिनविरोध करण्यात यशस्वी होणार का, याची उत्सुकता आहे.
खासदार उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्ष
अजिंक्यतारा कारखान्यावर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकहाती सत्ता आहे. भोसले घराण्याचे राजकीय मनोमीलन होण्यापूर्वी खा. उदयनराजे भोसले गटाकडून ‘अजिंक्यतारा’ची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या कारखाना निवडणुकीत या गटाने भाग घेतला नाही. त्यामुळे आताच्या निवडणुकीत खा. उदयनराजे कोणती भूमिका घेणार, याविषयी उत्सुकता आहे. त्यांनी जर निवडणूकीसाठी पॅनेल टाकण्याची घोषणा केल्यास सातारा जिल्ह्यातील राजकिय वर्तुळात मोठी खळबळ होणार आहे.
COMMENTS