Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी चेअरमन पी. एन. जोशी यांचे निधन

सातारा / प्रतिनिधी : येथील युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर नारायण उर्फ पी. एन. जोशी यांचे आज त्यांच्या का

काँग्रेसच्या गतवैभवासाठी कामाला लागा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन
इस्लामपूर पालिका राष्ट्रवादी अंतर्गत गटबाजीमुळे ’विकास आघाडी’ रिचार्ज
कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे 10 तारखेला उपोषण : अशोकराव पाटील

सातारा / प्रतिनिधी : येथील युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर नारायण उर्फ पी. एन. जोशी यांचे आज त्यांच्या कांगा कॉलनीतील घरी अल्पशा आजाराने निधन झाले. संगम माहुलीतील कैलास स्मशानभूमीत जोशींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नामवंत अर्थ तज्ञ म्हणून देशभर ओळख असलेल्या जोशी यांचा जन्म चिक्कोडी (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिक्कोडी व बेळगाव या ठिकाणी झाले. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र व इतिहास या विषयांतून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अर्थशास्त्र विभागात सुमारे 15 वर्ष काम केले. त्यानंतर ते त्याच ठिकाणी वरिष्ठ अधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी बँक ऑफ इंडियात महाव्यवस्थापक म्हणून काम केले. तेथील त्यांच्या कामाची दखल घेत रिझर्व्ह बँकेने त्यांची युनायटेड वेस्टर्न बँकचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली.
सन 1990 ते 2000 या दहा वर्षाच्या काळात त्यांनी बँकेच्या प्रगतीत योगदान दिले. या काळात त्यांनी बँकेच्या कामकाजात अमुलाग्र बदल केले. संगणकीकरण, एटीएम केंद्र, फॉरेन एक्सजेंज, पब्लिक इश्यू राईटस् या राबविलेल्या अभिनव उपक्रमांची चांगली चर्चा झाली. त्यानंतर ते सारस्वत सहकारी बँकचे बँकिग डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. त्याबरोबरच सध्या ते येथील शास्त्र महाविद्यालयचे सदस्य, तसेच धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या एमबीए कॉलेजचे गव्हर्निंग बॉडी सदस्य होते. त्याचबरोबर अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्टचे विश्‍वस्त व पी. एन. जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष होते.
बँकिंग व आर्थिक क्षेत्रातील जाणकार म्हणून त्यांची देशभर ओळख होती. या संदर्भातील सरकारच्या धोरणांवर त्यांनी वेळोवेळी विविध माध्यमातून लिखाण केलं. त्यांची माय मेमरीज-गिलीम्सेस ऑफ चेंजिंग बँकिंग सिनॅरिओ, बँकिंग आणि वित्त धोरण – एक परामर्श, बदलत्या बँकिंगच्या छटा – माझ्या आठवणी व नॅशनल बॅकिंग पॉलिसी फॉर इनक्लूसिव्ह डेव्हलपमेंट ही पुस्तके चांगली गाजली. खासगी बँक संघटनेचे ते पहिले अध्यक्ष होते. निवृत्तीनंतर ते सातार्‍यात स्थायिक झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज सतार्‍यातील कांगा कॉलनीतील घरात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच युनायटेड वेस्टर्न बँक तसेच आयडीबीआय परिवाराला धक्का बसला.
युनायटेडचे माजी जनरल मॅनेजर रत्नाकर तांडेल, सदाशिव क्षिरसागर, माजी व्यवस्थापक अनंत जोशी, बँकेच्या अधिकारी संघटनेचे माजी अध्यक्ष डी. आर. देशपांडे, जनरल सेक्रेटरी दत्तात्रय भिडे, आयडीबीआय बँक अधिकारी संघटनेचे माजी अध्यक्ष दिलीप वेलणकर, अध्यक्ष गोपाल जरे, सचिव भालचंद्र दामले, बँकचे माजी अध्यक्ष व जोशी यांचे पी. ए. विनायक कुलकर्णी चंद्रशेखर नावलीकर यांनी श्रध्दांजली वाहिली. सातार्‍याचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, त्यांचे सहकारी अरूण गोडबोले, विश्‍वास दांडेकर, नगरसेविका स्नेहलता नलावडे, पूर्वा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. चंद्रकांत नलावडे, मराठा सेवा संघाचे युवराज पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अत्यंदर्शन घेतले.

COMMENTS