राजकारणाचा उकिरडा

Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकारणाचा उकिरडा

होळीच्या वेळी एकमेकांच्या नावाने बोंबा मारून शिमगा करण्याची प्रथा आहे.. पण महाराष्ट्रात सध्या राजकारण्यांनी रोजच शिव्यांचा शिमगा सुरू केला आहे. एकमेक

खडसेंची राजकीय गोची
इंडिया आघाडीची वाट बिकट
केंद्राच्या कारवाईवर ‘सर्वोच्च’ प्रश्‍नचिन्ह

होळीच्या वेळी एकमेकांच्या नावाने बोंबा मारून शिमगा करण्याची प्रथा आहे.. पण महाराष्ट्रात सध्या राजकारण्यांनी रोजच शिव्यांचा शिमगा सुरू केला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडता झाडता शिव्या देण्यापर्यंत त्यांनी मजल मारलीय. हा शिमगा काही एक दिवस सुरू नाही, तर तो रोजच सुरू आहे. या शिमग्यामुळे सर्वसामान्यांचे मनोरंजन होत नसेल तर नवलच. आज कुणाची विकेट जाणार, आज कुणाच्या घराचे अतिक्रमण पडणार, आज कुणाच्या घरी ईडीचे छापे पडणार, अशी उत्सुकता आता महाराष्ट्राच्या जनतेला राहिली नाही. कारण यात आता कोणतीही नवलाई राहिलेली नाही. रोज कुणाच्या तरी घरी ईडीचे छापे पडणार, रोज कुणीतरी नवा आरोप करणार, हे महाराष्ट्राला नित्याचेच झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणांचा सध्या उकिरडा झाला आहे. नळावरच्या बायका जश्या सकाळी कर्ण-कर्कश आवाजात भांडण करतात, त्याचप्रकारे राज्यात देखील एकमेकांवर पत्रकार परिषदा घेऊन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. बरं या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत कोणताही तर्कशुद्धपणा नाही. एकमेकांना शिव्या काय, एकमेकांना धमक्या काय, या संपूर्ण प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण पार रसातळाला गेल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्राच्या मातीला जसा संत तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्‍वर, एकनाथ यांचा वारसा आहे, तसाच तो वारसा महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा देखील आहे. या समृद्ध वारश्याने महाराष्ट्र समृद्ध झाला आहे. तीच पंरपरा महाराष्ट्राच्या राजकारणात देखील कायम होती. एकमेकांवर संयमी भाषेत आणि चिमटे घेणारी, मार्मिक टीका केली जायची. त्यात एकप्रकारची खिलाडूवृत्ती होती, तशीच त्यात एकप्रकारे समोरच्या चुका दाखविण्याचा देखील प्रयत्न होता. शिवाय आपण चुकत असेल, तर समोरचा ते खुलेपणाने कबूल करायचा, आणि त्यात दुरूस्ती करायचा. मात्र गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणांचा पार उकिरडा झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा उकिरडा होण्यामागे केंद्र सरकारचा वाढता हस्तक्षेप आणि तपास यंत्रणांचा वाढता गैरवापर कारणीभूत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. येन, केन प्रकारे सत्ता मिळवायचा चंग बांधल्यामुळेच की काय, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र प्रकारची लढाई सुरू असल्याचे दिसून येत आहे. नारायण राणे विरुद्ध भाजप, संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या, आणि महाविकास आघाडीविरूद्ध भाजप असा संघर्षाचा सामना रोज बघायला मिळत आहे. रोज नवे आरोप, रोज नवे खुलासे, आणि रोज नव्या भानगडी, आणि माध्यमातून या सर्वांचा होणारा भडीमार, यामुळे महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेला जात आहे, याचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण, सुधाकर नाईक, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार, शंकरराव चव्हाण यासारखे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. मात्र या कालावधीत कधी राजकारणांची पातळी खालावली नाही. किंवा राजकारणाचा पोत घसरला नाही. विधीमंडळात देखील आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणांनी संपूर्ण विधीमंडळ दणाणून सोडणारे नेते महाराष्ट्रात होते. पण आता त्यांचा वारसा लोप पावतो की काय, अशी भीती आता वाटायला लागली आहे. निवडणुकांमध्ये होणारे हल्ले, त्यानंतर आमदार असो की केंद्रीय मंत्र्यांना होणारी अटक असेल, यामागे राजकारणांचा खेळ आहे. मात्र राजकारणात एक नियम आहे. काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍याच्या घरावर दगड फेकु नये. म्हणजेच राजकारणातील सर्वच नेते चारित्र्यवान असतील, त्यांचे हात कुठे दबलेले नसतील, असे नाही. त्यामुळे एकमेकांची नस कुठे दाबायची, हे राजकारण्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे राजकारणात सध्या नाक दाबले की तोंड उघडते, असा प्रकार सुरू आहे. आणि यात तीव्र अहंकार दिसून येतो. त्यामुळे सत्ताधारी असो की विरोधक, यांच्या आरोप-प्रत्यारोपातून महाराष्ट्राच्या राजकारणांची हानी होतांना दिसून येत आहे.

COMMENTS