तेहत्तीस कोटी देवांना विसरलात तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू नकाजय शिवराय म्हटले की, तेहत्तीस कोटी देवांची फलटण बाद होते. जर आमच्या
तेहत्तीस कोटी देवांना विसरलात तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू नका
जय शिवराय म्हटले की, तेहत्तीस कोटी देवांची फलटण बाद होते. जर आमच्या देशामध्ये तेहत्तीस कोटी देव असतील तर
अफजलखानाला, दिलेरखानाला, शाहिस्तेखानाला धडा शिकविण्यासाठी एक दोन देव खाली का उतरले नाहीत. शेवटी शिवरायांना आणि मावळ्यांना हातात तलवार घ्यावी लागली. रणांगण गाजवावे लागले. त्यातून स्वराज्य निर्माण झाले. तेहत्तीस कोटी देवांना विसरलात तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू नका. प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या शिवचरित्रातील या संदर्भाची आठवण डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी करून दिली.
मराठा समाज मंडळाकडून व्याख्यान कार्यक्रमाने शिवजयंती साजरी
लोणंद / प्रतिनिधी : जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तीचे विदवान आपल्या देशाला संविधान दिले. त्या बाबासाहेबांनी शिवाजी राजांवर नितांत प्रेम केले. रायगडावर जाऊन मुक्काम केला. दर्शन घेतलं. जय भवानी जय शिवाजी जी घोषणा आपण देतो. जय जिजाऊ जय शिवाजी ही घोषणा अलीकडच्या काळातली. पण सुमारे शंभर ते दीडशे वर्षापासून आपण जय भवानी जय शिवाजी म्हणतो. जय भवानी आणि जय शिवाजी ही घोषणा या देशामध्ये प्रथमत: कोणी दिली. तर ती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जय भवानी जय शिवाजी घोषणेचे जनक आहेत, असे वक्तव्य सुप्रसिध्द इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले.
ते लोणंद, ता. खंडाळा येथे मराठा समाज मंडळ यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष मधुमती पलंगे, लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर, मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष दशरथ इंदलकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. श्रीमंत कोकाटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. कोकाटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा मांत्रीकावर, ज्योतिषावर विश्वास नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 361 किल्ले जिंकले. काही बांधले पण एका ही किल्ल्याच वास्तू शास्त्र पाहिले नाही. सत्यनारायण केला नाही. शिवाजी महाराजांच्या काळात सत्यनारायण नव्हता. ही अलीकडच्या काळात आपल्या देशात आलेली रोजगार हमी योजना आहे, असेही त्यांनी सांगितले. किराणा दुकानात वाईन सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या या निर्णयावर डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी खरमरीत शब्दांत टीका करताना वाईन ही दारू नाही मग अमृत आहे का? असा सवाल उपस्थित केला. शून्य टक्के व्याज दराने कर्ज देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे सांगत असताना त्यांनी हल्ली कर्जाचे व्याजदर हे शोषण करणारे असून ते व्याज दर कमी असावे, असेही म्हटले आहे. समाजातील असलेली अंधश्रध्दा, हुंडा प्रथा, चुकीच्या अनिष्ट प्रथा या सारख्या अनेक विषयांवर त्यांनी रोखठोक आणि परखडपणे आपली भुमिका मांडली.
अंकनाद या स्पर्धेत महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळविलेल्या बाल विक्रमवीर आदित्य रविकांत भोसले या विद्यार्थ्याचा या कार्यक्रम प्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. श्रीमंत कोकाटे यांचा परिचय डॉ. अनिलराजे निंबाळकर यांनी करून दिला. प्रास्ताविक हेमंत निंबाळकर व सूत्रसंचालन शंभूराज भोसले यांनी केले तर उपस्थितांचे आभार शुभम दरेकर यांनी मानले.
महात्मा फुले यांनी पहिली शिवजयंती सुरू केली
महात्मा ज्योतिराव फुले सन 1869 मध्ये रायगडावर गेले. चार दिवस थांबून त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली. पुण्यामध्ये आले. पहिली शिवजयंती महात्मा ज्योतीराव फुले यांनी सुरू केली. 908 ओळींचा पोवाडा त्यांनी लिहिला.
महात्मा फुले म्हणाले होते, कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्यांचा आणि छत्रपती शिवाजी राजांचा… अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांचा राजा असे वर्णन महात्मा फुले त्या पोवाड्यात केल्याचे डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी बोलताना स्पष्ट केले.
COMMENTS