अपघातांमुळे नगर-दौंड महामार्ग ठरतोय जीवघेणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपघातांमुळे नगर-दौंड महामार्ग ठरतोय जीवघेणा

अहमदनगर/प्रतिनिधी : सिमेंट काँक्रीटीकरणने तयार केलेल्या नगर-दौंड महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे या महामार

श्री शिवाजी विद्यालयाचा 91. 66 टक्के निकाल
कांदा आणतोय…आतापासूनच डोळ्यांत पाणी…
कुंभात कोरोनाचा स्फोट , टॉपचे साधू संत कोरोनाच्या विळख्यात | ‘१२च्या १२बातम्या’ | Lok news24

अहमदनगर/प्रतिनिधी : सिमेंट काँक्रीटीकरणने तयार केलेल्या नगर-दौंड महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे या महामार्गावर अपघात वाढले असून, त्यात निष्पाप व्यक्तींचे बळी जात आहेत. या महामार्गालगतच सुरू करण्यात आलेले गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडल्यामुळे या महामार्गावर दररोज अपघात होत आहेत.
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून देशभरात विविध राष्ट्रीय महामार्गांची कामे सध्या जोरात सुरू आहेत. नगर जिल्ह्यातील अनेक महामार्गही राष्ट्रीय महामार्गांमध्ये समाविष्ट झाल्याने त्यांचाही विकास होत आहे. यातीलच एक असलेल्या नगर-दौंड महामार्गाचे काम करण्यात आलेले आहे. हा दुपदरी असलेला महामार्ग सिमेंट काँक्रीटीकरणाचा केल्याने तो एक्स्प्रेस हाय-वे सारखा चौपदरी स्टार रोड झाला आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. मात्र, हा वेगच अनेक अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. गेल्या वर्षभरात या महामार्गावर 100 पेक्षा अधिक बळी गेले आहेत. नगर ते दौंडपर्यंत सुमारे 60 ते 70 किमी लांबीच्या या महामार्गावर दररोज अपघात होत आहेत. हा महामार्ग अपघातप्रवण क्षेत्र बनला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या अपघातात अनेकांचे बळी जात आहेत. त्यामुळे या महामार्गावरील प्रवास वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहेत.

सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव
या महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी ज्या सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या कुठेच दिसत नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत. महामार्गावर कोठेही सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले दिशादर्शक फलक लावले गेलेले नाहीत. ठिकठिकाणी रिफ्लेक्टर किंवा गावाजवळ रबलिंग नाहीत. संपूर्ण महामार्गावर नगर शहर ते अरणगावपर्यंत याव्यतिरिक्त पुढे कुठेही रस्ते दुभाजक नाहीत. त्यामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप या महामार्गालगतच्या गावांमधील नागरिकांकडून केला जात आहे. या सुरक्षेच्या उपाययोजना करण्याकडे संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा महामार्ग प्रवासासाठी सुखकर होण्याऐवजी जीवघेणा ठरत आहे.

एकाच दिवसात 3 अपघात
नगर- दौंड महामार्गावर मागील मंगळवारी (दि.8) दुपारनंतर अवघ्या काही तासाच्या कालावधीत तीन ठिकाणी अपघात झाले आहेत. हिवरे झरे येथे तवेराच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली. या अपघातात सागर शहाजी मोहारे (वय 23, रा.मोहारवाडी, कोळगाव, ता.श्रीगोंदा) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा तरुण उन्हाळी सोयाबीनचे बियाणे घेऊन कोळगावकडे मोटारसायकलवर जात होता. हिवरे झरे गावाजवळ रस्त्याचे काम सुरू होते. तसेच त्याच परिसरात गॅस पाईपलाईनचे काम रखडलेले असल्याने समोरुन येणार्‍या तवेरा गाडीने दुसर्‍या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात मोहारे यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत मोटारसायकल 15 फूट उडून पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात जावून पडली. या धडकेत सागर मोहारे याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर खंडाळ्याजवळ इंडीगो कारने धडक दिल्याने एक तरुण जखमी झाला. खडकीजवळ दोन वाहनांची धडक होऊन त्यामधील तीन ते चार जण जखमी झाले. हिवरे झरे येथे झालेल्या अपघात प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी तवेरा चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

..तर, आंदोलन करू
गॅस पाईपलाईनचे रखडलेले काम तातडीने पूर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नगर-दौंड महामार्गालगतच पेट्रोलियम कंपन्यांच्या गॅस पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. या कामासाठी आणून ठेवलेले मोठमोठे लोखंडी पाईप रस्त्याच्या कडेलाच पडून आहेत. ठिकठिकाणी केलेल्या खोदाईमुळे मुरुमाचे व मातीचे ढिगारेही रस्त्यालगतच आहेत. हे रखडलेले कामही अपघातांना निमंत्रण देत आहे. या कामामुळेच या महामार्गावरील अपघात वाढले असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केला आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत वारंवार संबंधित ठेकेदाराकडे पाठपुरावा करुनही ते काम सुरू होत नसल्याने वारंवार अपघात होत असून याविरोधात आता जनआंदोलन करावे लागणार आहे. प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना तसेच या पाईपलाईनचे रखडलेले काम पूर्ण करावे अन्यथा जनतेच्या रोषाचा सामना करण्याची तयारी ठेवावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

COMMENTS