Homeताज्या बातम्याशहरं

जपानने उडवला थायलंडचा धुव्वा; उपांत्य फेरीत धडक

नवी मुंबई / प्रतिनिधी : जपानने एएफसी वुमन्स आशिया कप भारत 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारताना थायलंडचा 7-0 गोलने धुव्वा उडवला. डीवाय पाटील

माण देशी चॅम्पियन्सच्या उपक्रमामुळे म्हसवडमध्ये जलतरण स्पर्धा; राज्यातील लोकांमध्ये आश्‍चर्य
महाराष्ट्र केसरीस पै. संजय पाटलांच्या स्मरणार्थ एक लाखाचे बक्षीस जाहीर
मनू भाकरने पटकावले कांस्यपदक

नवी मुंबई / प्रतिनिधी : जपानने एएफसी वुमन्स आशिया कप भारत 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारताना थायलंडचा 7-0 गोलने धुव्वा उडवला. डीवाय पाटील स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात जपानने जबरदस्त आक्रमक खेळ करताना थायलंडला कोणतीही संधी दिली नाही. या शानदार विजयासह दोन वेळच्या विजेत्या आणि गतविजेत्या असलेल्या जपानने 2023 साली ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्या यजमानपदाखाली होणार्‍या फिफा विश्‍चचषक स्पर्धेसाठी थेट पात्रताही मिळवली.
उपांत्य सामन्यात जपानचा सामना चीन विरुध्द व्हिएतनाम यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध होईल. दुसरीकडे, सन 1983 नंतर पहिल्यांदाच महिला आशिया चषक उंचावण्याची थायलंडचे स्वप्न धुळीस मिळाले. मात्र, असे असले तरी प्ले ऑफ सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करुन विश्‍वचषक स्पधेर्साठी पात्र ठरण्याची संधी त्यांच्याकडे आहे.
कोरोनाचा शिरकाव झाल्याने थायलंडला आपल्या काही खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये जपानविरुध्द खेळावे लागले. याचा मोठा फटका त्यांना बसला. युइका सुगासवा हिने चार गोल नोंदवत जपानच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. हिनाता मियाझावा, रिन सुमिदा आणि रिको युएकी यांनी प्रत्येकी एक गोल केला.
जपानने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत अल्पावधीतच सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. माना इवाबुचीने दोन वेळा आक्रमण केल्यानंतर 14 व्या मिनिटाला जपानला आघाडीवर नेण्याची सुवर्ण संधी गमावली. पेनल्टी बॉक्समध्ये थायलंडच्या विलैपोर्न बूथडुआंग हिने रिन सुमिदाला पाडून फाऊल केल्याने जपानला पेनल्टी किक बहाल करण्यात आली. यावेळी मानाने मारलेली किक थायलंडची गोलकीपर वारापोर्न बून्सिंगने अचूकपणे रोखत जपानला आघाडी घेण्यापासून दूर ठेवले.
यानंतरही बून्सिंगने अडखळत का होईना, पण जपानचे आक्रमण रोखले आणि 27 व्या मिनिटाला तिने जपानला गोल करु दिले नाही. मात्र, 27व्या मिनिटाला युइका सुगासवाने गोलजळ्याच्या बरोबर समोरुन जोरदार किक मारत जपानला 1-0 गोल असे आघाडीवर नेले. थायलंडने यानंतर कडवा प्रतिकार करत पुन्हा एकदा भक्कम बचाव केला. मात्र, मध्यंतराच्या काही सेकंद आधी हिनाता मियाझावानेही गोलजाळ्याच्या जवळून अचूक किक करत जपानची आघाडी 2-0 गोल अशी भक्कम केली.
दुसर्‍या सत्राचा खेळ सुरु झाल्यानंतर तिसर्‍याच मिनिटाला सुमिदाने जपानचा तिसरा गोल नोंदवत थायलंडच्या स्वप्नांना सुरुंग लावला. तिसरा गोल स्विकाराल्यानंतर थायलंडने काहीसे सावरत असतानाच जपानने मात्र आपला खेळ आणखी वेगवान करताना सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. थायलंडकडून काहीसा धुसमुसळा खेळही झाला. फोनफिरुन फिलावनने सुगासवाला खाली पाडल्याने जपानला आणखी एक पेनल्टी किक मिळाली. या संधीचा फायदा घेत सुगासवा हिने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथा गोल केला.
जपानचा वेग झाला नाही. उर्वरीत वेळेत जपानने आणखी 3 गोल केले. रिको युएकीने 75 व्या मिनिटाला गोल केला. पाच मिनिटांनी सुगासवाने आपली हॅटट्रिक पूर्ण करत संघाचा सहावा गोल केला आणि यानंतर 83 व्या मिनिटाला वैयक्तिक चौथा गोल करत जपानच्या 7-0 गोलने दिमाखदार विजयावर शिक्कामोर्तब केले.

COMMENTS