आतापर्यंत धरली तग, यापुढे जगायचे कसे? ;  रेस्टॉरंट चालकांचा प्रशासनाला सवाल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आतापर्यंत धरली तग, यापुढे जगायचे कसे? ; रेस्टॉरंट चालकांचा प्रशासनाला सवाल

पुण्यामध्ये वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शहरात फक्त पार्सल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.

गुंतवणूकदारांना सव्वा तीन लाख कोटींचा फटका
जे जे रुग्णालयात कोविड चाचणीसाठी डमी ओपीडी 
आमदार काळेंच्या वाढदिवसानिमित्त तळेगांव -मळे येथे वृक्षरोपण.

पुणे/प्रतिनिधी: पुण्यामध्ये वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शहरात फक्त पार्सल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. याचा खूप मोठा फटका बसत असल्याचे मत रेस्टॅारंट चालकांनी व्यक्त केले आहे. टाळेबंदीमध्येच कशीबशी तग धरली; पण आता मात्र कसे जगायचे असा प्रश्‍न आहे, असे मत पुण्यातील रेस्टॅारंट चालकांनी व्यक्त केले आहे. अनेकांनी रेस्टॅारंट बंद केली, तर काहींनी कर्ज काढून तग धरली होती. आता रेस्टॉरंट आणखी बंद करण्याची वेळ येईल, असे मत रेस्टॉरंट चालकांनी व्यक्त केले.

संदीप नारंग यांची पुण्यामध्ये आठ रेस्टॅारंट होती; पण पहिल्या टाळेबंदीचा फटका इतका होता, की त्यांना तीन रेस्टॅारंट बंद करावी लागली. डिलिव्हरीला जास्त स्कोप नसल्यामुळे त्यांनी आजपासून त्यांची हॅाटेल्स पुन्हा बंद ठेवली आहेत; पण हे किती दिवस चालणार याचा अंदाज येत नसल्याने आहे हे तरी सुरू राहणार का, असा प्रश्‍न त्यांना भेडसावतो आहे. नारंग म्हणाले, की आम्ही तीन हजार चौरस फुट जागेचे भाडे भरतो आणि अगदी तीनशे स्क्वेअर फुट किचनची जागा वापरतो. मग डिलिव्हरीसाठी रेस्टॅारंट सुरू तरी का ठेवायची असा प्रश्‍न आहे. आत्तापर्यंत कशीबशी तग धरली आहे. आता मात्र अवघड आहे असे नारंग म्हणाले. एकीकडे नारंग यांची ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर शाही भोग नावाचे रेस्टॅारंट चालवण्यार्‍या दर्शन रावळ यांनी तर फेब्रुवारी महिन्यातच रेस्टॅारंट सुरू केले होते; पण 10 दिवस होता होता बंधने वाढवायला सुरुवात झाली आणि आता त्यांना रेस्टॅारंट पुन्हा पूर्ण बंद करावे लागले आहे. दिवसाकाठी हजारो रुपयांचे उत्पन्न बुडत असेल तर आम्ही कसे मॅनेज करत असू. जरा विचार करा. मी कर्ज काढून हफ्ते फेडतो आहे. वीजबील पण इन्स्टॅालमेंट मध्ये भरतोय. आता पुन्हा उत्पन्न बंद. काय करायचे कळेना. मला यामुळे अँक्झांयटीचा त्रास सुरु झाला, असे त्यांनी सांगितले. युनायटेड पुणे रेस्टॅारंटचे अजिंक्य शिंदे म्हणाले, की असे कुठे सिद्ध झाले आहे, की रेस्टॅारंटमुळे कोरोना पसरतो? आम्ही सरकारने सांगितलेली सर्व नियमावली पाळतो आहोत. मग हे बंधन कशासाठी? आमचे व्यवसाय कोलमडले आहेत.

COMMENTS