इस्लामपूर / प्रतिनिधी : गत 2016 च्या पालिका निवडणुकीत विकास आघाडीने ना. जयंत पाटील यांच्या 30 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला होता. पालिकेतील राष्
इस्लामपूर / प्रतिनिधी : गत 2016 च्या पालिका निवडणुकीत विकास आघाडीने ना. जयंत पाटील यांच्या 30 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला होता. पालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता गेल्याने 5 वर्षात मंत्री पाटील यांनी इस्लामपूर नगरपालिकेत पाऊल ठेवले नाही. गेल्या आठवड्यात नगरपालिकेच्या पदाधिकार्यांचा कार्यकाल संपल्यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर नगरपालिकेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत गेल्या पाच वर्षांमध्ये विकास आघाडीने कोण-कोणती विकास कामे केली याबाबत विचारणा करत विकास आघाडीच्या कामाबद्दल संशय व्यक्त केला.
इस्लापूर नगरपालिकेवर दिवंगत विजयभाऊ पाटील यांनी 30 वर्षे राष्ट्रवादीची सत्ता अबाधित ठेवली होती. मात्र, सन 2016 च्या निवडणुकीत विकास आघाडीने विजयभाऊंच्या 30 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत इस्लामपूर पालिकेवर विकास आघाडीचा झेंडा फडकला. पालिकेतील राष्ट्रवादीचा पराभव मंत्री जयंत पाटील यांना चांगलाच जिव्हारी लागला होता. या पराभवामुळे मंत्री पाटील यांनी इस्लामपूर पालिकेतून पाच वर्षे लक्ष काढून घेतले होते. गेल्याच आठवड्यात विकास आघाडीचा नगरपालिकेतील कार्यकाळ संपला. त्यामुळे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी प्रशासक म्हणून नगरपालिकेची सूत्रे हाती घेतली. सदस्यांचा कार्यकाल संपताच ना. जयंत पाटील यांनी पालिकेत आढावा बैठक घेतली.
सन 2016 पासून विकास आघाडीने शहरांमध्ये कोण कोणती नवीन विकास कामे केली. असा सवाल ना. पाटील यांनी बैठकीत उपस्थित करत विकास आघाडीच्या कामावर संशय व्यक्त केला. शहरांमध्ये सुरू असलेले भुयारी गटरचे काम, पाणी पुरवठा, रस्त्यांची कामे व दुरुस्ती, पार्किंग अशा अनेक प्रकारचे प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवून व विकास कामांना गती देण्यासाठी राज्य शासनाकडून पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी बैठकीत दिले. इस्लामपूर पालिकेत मंत्री पाटील यांनी पाच वर्षानंतर पाऊल ठेवल्याने आगामी पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असल्याची चर्चा इस्लामपूर शहरात सुरू आहे.
COMMENTS