एसटी संप आणि त्यातील बरेच काही…

Homeताज्या बातम्यासंपादकीय

एसटी संप आणि त्यातील बरेच काही…

महाराष्ट्राच्या जनतेने लालपरी असणाऱ्या एसटीवर कायम प्रेमच केले. दुर्गम, डोंगरदऱ्यात, ग्रामीण भागात, सहजपणे सेवा देणारी, नफ्याची कोणतीही अपेक्षा नसणार

कोपरगावमध्ये मोफत सर्व रोग निदान शिबीर उत्साहात
नगरमध्ये हसरा मतदार, हसरी लोकशाही अभियान
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये ५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे  – आ. राम सातपुते 

महाराष्ट्राच्या जनतेने लालपरी असणाऱ्या एसटीवर कायम प्रेमच केले. दुर्गम, डोंगरदऱ्यात, ग्रामीण भागात, सहजपणे सेवा देणारी, नफ्याची कोणतीही अपेक्षा नसणारी या लालपरीला गेली दोन महिने महाराष्ट्राची जनता मुकली. अत्याधुनिक प्रवाशी वाहनांच्या सुविधा असणाऱ्या आजच्या काळातही जनता मात्र, एसटी बसलाच प्राधान्य देते. याचे मुख्य कारण जेव्हा काहीच सुविधा नव्हत्या तेव्हापासून प्रवासाची सेवा देणाऱ्या बसवर जनता आजही फिदा आहे. अशा या बससेवेचा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असणारा संप मिटण्याची काही चिन्ह दिसेना. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शिष्टाईला देखील काही यश येताना दिसेना. भाजपच्या नेत्यांचा महाविकास आघाडीवर रोजचा घणाघात! त्यातच कोणतीही चळवळ, संघटना, आंदोलन असं काहीही चालवण्याचा अनुभव नसलेले आणि एवढंच काय तर वकिली पेशाही धड न चालवणाऱ्या व्यक्तिमत्वाकडे आख्या महाराष्ट्राच्या एसटी कर्मचाऱ्यांनी थेट नेतृत्व म्हणून स्विकारणे हेच आश्चर्य वाटले. परंतु, या संपातील आणखी आश्चर्य म्हणजे इंटक सारखी सर्वात मोठी कामगार संघटना ही काॅंग्रेसच्या अधिपत्याखाली असतानाही या संपात सामिल आहे. डाव्या संघटना आणि हिंदुत्ववादी कामगार संघटना देखील या संपात सहभागी आहेत. महाविकास आघाडी सरकारला जनता आणि कर्मचारी यांचा रोष पत्करून सुध्दा विरोधी पक्षाच्या आक्रमकतेला झेलावे लागत आहे. अशा परिस्थितीत आज एकाएकी महाविकास आघाडीचे शिल्पकार असणारे शरद पवार यांनी सर्व एसटी कामगार संघटनांच्या  नेत्यांना एकत्रित आणल्याने एसटी संप संपण्याचे संकेत स्पष्ट झाले. मात्र, याच अनुषंगाने नेमका प्रश्न उपस्थित होतो की, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणारे शरद पवार यांच्या शब्दांत एवढी ताकद असताना त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला इतके दिवस एसटी प्रवासाला मोताद का केले. एसटी कामगारांच्या सध्याच्या संपाची तुलना १९८२ च्या गिरणी कामगार संपाशी केली जाते. याचा अर्थ कामगारांना देशोधडीला लावणारा हा संप असल्याची ही चर्चा महाराष्ट्रात होत राहीली. जर महाविकास आघाडीकडे शरद पवार यांच्या रूपाने एवढे हुकूमी नेतृत्व असताना संप लांबला का? हा संप लांबला की लांबवला असा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहतो. एकमात्र खरे की एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपात सर्वपक्षीय पाठबळ मिळाल्याचा संशय बळावला होता, त्यात काही तथ्ये असावीत! राज्याची जनता प्रवासाच्या सोयी-सुविधा पासून वंचित ठेवण्यामागे नेमका काय विचार असावा हा देखील मुलभूत प्रश्न बनतो. राज्यभरातील एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जागांवर विरोधीपक्षासह राज्यकर्त्यांची देखील नजर आहे, असा आरोप सातत्याने केला जातो. त्याचबरोबर एसटीचा प्रवासी महसूल यावर खाजगी क्षेत्राची नजर आहेच. या सर्वबाबी लक्षात घेता एसटी संपाचा तिढा सुटणे सहज नसल्याचे लक्षात येते. परंतु, कर्माचाऱ्यांचा आर्थिक विवंचनांमुळे सुटणारा संयम आणि जनतेची वाढत चाललेली निराशा यामुळे संप मिटवणे महाविकास आघाडीची गरज बनली. याचा थोडक्यात सारांश सांगायचा झाला तर आशिया खंडातील सर्वात मोठी सार्वजनिक प्रवासी सेवा असणाऱ्या महामंडळाला शेवटची घरघर लागलीय असे संकेत संप मिटो अथवा ना मिटो तरी कायम राहणार. संप मिटवण्याचे श्रेय जर सर्व कामगार संघटनांच्या नेत्यांना मिळत असेल तर तो एक चांगला संकेत आहे. कारण, नेतृत्वाचा कोणताही अनुभव नसणाऱ्या व्यक्तिला या संपाचे जे फुकटचे श्रेय मिळत होते, ते थांबणार. सदावर्ते यांच्या जागी येणारे सतिश पेंडसे हे या कामगार संपाचे गंभीर नेतृत्व करतील अशी, अपेक्षा आता वाढली आहे. जनचळवळीचा कोणताही अनुभव नसलेल्या सदावर्ते नावाच्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या जनतेला प्रवासी सुविधेपासून वंचित ठेवण्याची जी बाब केली ती अक्षम्य आहे. कोणतेही आंदोलन तुटेपर्यंत ताणणे म्हणजे नेतृत्व नव्हे. काही नेतृत्व हे लादले जाते तर काही डावपेचांचा भाग म्हणून आणले जाते,तर काही नेतृत्व उस्फूर्त असते. सदावर्ते यांचे नेतृत्व हा विरोधी पक्षाचा डावपेचांचा भाग होता.त्यामुळे असे नेतृत्व एकाएकी निकाली निघते. तेच एसटी संपात आता दिसून आले.

COMMENTS