सरंजामी झिंगाट !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

सरंजामी झिंगाट !

 काल बैलगाडा शर्यतींवरची बंदी न्यायालयाने उठवली. ही बातमी तशी पाहता सहज वाटावी, अशी आहे. परंतु, ती सहज यासाठी नाही की, ही बंदी उठविण्यासाठी खुद्द राज

बेलापूर-खंडाळा-अस्तगाव या रस्त्यांना निधी मंजूर करणार
ब्राम्हणगांव ते रवंदा रस्त्यावरील बाभळीच्या काट्या काढण्याची ठाकरे गटाची मागणी
महाबळेश्‍वरमध्ये मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट

 काल बैलगाडा शर्यतींवरची बंदी न्यायालयाने उठवली. ही बातमी तशी पाहता सहज वाटावी, अशी आहे. परंतु, ती सहज यासाठी नाही की, ही बंदी उठविण्यासाठी खुद्द राज्य सरकारने आपली सर्वतोपरी शक्ती सर्वोच्च न्यायालयात लावली होती. ज्यावेळी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गाजत असताना त्यावर मेहनत घेण्याऐवजी राज्य सरकार बैलगाडा शर्यतीवर मेहनत घेताना दिसली. कदाचित, या तुलनात्मक उल्लेखाने वाचकांचा गैरसमज होवू शकतो की, या दोन न्यायालयीन निर्णयासाठी राज्य सरकारच्या भूमिकेला मध्यवर्ती ठेवून ही चर्चा होईल. आजची चर्चा आपण फक्त बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी सरकारने अधिक प्रयत्न का केले असावे, या कूट प्रश्नाला समजून घेण्यासाठी आहे. खरेतर, बैल आणि बैलगाडा हा शेतकऱ्यांच्या घरातील एक अविभाज्य भाग. भरदार बैलजोडी आणि त्यांचा शेतातील राबता एकेकाळी ग्रामीण भागात प्रतिष्ठेचा भाग होता/आहे. कोणाकडे किती औतं आहेत, यावरून ग्रामीण भागाची श्रीमंती ठरवली जायची. तसं पाहिलं तर बैल या घटकाचे एकूण सांस्कृतिक जीवनात देखील प्रचंड महत्त्व. त्यामुळेच बैलपोळा सण साजरा केला जातो. बैल हा पुरूषसत्ताक समाजाचा प्रतिक आहे. स्त्रीसत्ताक समाजव्यवस्था ही पुरूषसत्ताक समाजव्यवस्थेत रूपांतरित होण्यासाठी बैल हा महत्वपूर्ण नव्हे तर अनन्यसाधारण घटक ठरला. कारण शेतीची मशागत स्त्रीया स्वतः करित असताना त्यात बैलाची मशागतीचा शोध लागल्याने दोन महत्वपूर्ण बदल झाले. एक म्हणजे उत्पादन व्यवस्था प्रचंड वाढली आणि दुसरा स्त्रीयांच्या मेहनतीची जागा बैलाने घेतल्याने साधनसत्ता पुरूषाच्या हाती एकवटली. त्याचे आजपर्यंतचे परिणाम आपण सर्वजण पाहत आहोतच. मात्र, औद्योगिक क्रांतीनंतर च्या काळात होणाऱ्या बदलांमुळे आणि यंत्र आणि तंत्र यात झालेल्या क्रांतिकारक बदलांनी ग्रामीण भागातील बैल आणि बैलगाडीच्या मालकीची प्रतिष्ठा जाऊन ट्रॅक्टर आणि आधुनिक शेती अवजारांची मालकी असण्याकडे ग्रामीण श्रीमंती आणि प्रतिष्ठा आली. परंतु, त्या त्या समाजात प्रतिष्ठेच्या म्हणून काही युनिक गोष्टी राहतात. त्या गोष्टींची गरज नसली तरी प्रतिष्ठा म्हणून त्या ठेवल्या जातात. त्या प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी नुसते बैल पोसत राहणे याला व्यावहारिक महत्व अशा प्रतिष्ठा जपणाऱ्यांच्या लेखी राहत नाही. पैसा, प्रतिष्ठा आणि सत्ता आली तरी त्याची मिजाज दाखवण्याची सरंजामी वृत्तीही वाढत जाते. मग ही वृत्ती झिंगाट होत जाते. प्रतिष्ठेचा बाज आणि मिरासदारी ची नशा अशा प्रतिष्ठांतांनी अनुभवली नाही तर नवल! या सरंजामी झिंगाट वृत्तीतून मग जो एक बेमूर्वतपणा येतो त्याला जोपासले जाते. त्यातूनच बैल आणि बैलगाडा यांच्या शर्यतीचा सरंजामी झिंगाट खेळ सुरू होतो. सत्ता-संपत्तीच्या विळख्यात असताना वेळ घालवायला आवश्यक असणारा बाज अशा प्रकारातून मिळवला जातो. गावातील चारचौघे भक्त तयार होतात. आजूबाजूच्या पंचक्रोशीत ‘आपलीच चर्चा मालक’, अशी ठसकेबाज वाक्य पेरत ही मंडळी गावचे प्रतिष्ठित श्रीमंत सत्ताधाऱ्यांच्या प्रतिष्ठेला कृत्रिम दर्प चढवत जातात. मग त्यातून कोण्या सजीव प्राण्याच्या जिवाची पर्वाच का करायची असा एक अमानवीय स्वभाव आकाराला येतो. त्यातच जग जेवढे आधुनिक होत जाते तेवढे संवेदनशील जगही आकारत असते. म्हणून दुसऱ्या बाजूला प्राणी मित्र तयार होऊन अशा प्रकारांना मज्जाव करण्याचा प्रयत्न करतात. या दोघांत मग आधुनिक लोकशाहीत एक लढा आकारास येतो. हा लढा न्यायालयीन पातळीवर जिंकण्याचा प्रयत्न सरंजामी समाज करतो तर आधुनिक मानवी मूल्य जपणारा समाज त्यास विरोध करतो. आमचे म्हणणे एवढेच की, या लढ्यात सध्या सरंजामी वृत्ती जिंकली आहे; त्यास राज्य सरकारने भरीव मदत केली, म्हणून हे सरकार अजूनही सरंजामी वृत्तीतून बाहेर पडले नाही, हेच खरे आहे!

COMMENTS