कराड : नुकसानग्रस्त ऊसतोड मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना डॉ. अतुल भोसले. ऊसतोड मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; 5000 हजार कुटुंबाना आध
ऊसतोड मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; 5000 हजार कुटुंबाना आधार
इस्लामपूर / कराड/ प्रतिनिधी : अवकाळी पावसाच्या तडाख्याने पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड मजुरांची मोठी दैना झाली आहे. सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने ऊसतोड मजुरांच्या खोपटात पाणी शिरले आहे. संसारोपयोगी साहित्यासह अन्नधान्याचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. अशा अडचणीच्या काळात कृष्णा कारखाना नुकसानग्रस्त ऊसतोड मजुरांच्या मदतीला धावला आहे. कारखान्यामार्फत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते ऊसतोड मजुरांना करण्यात आले.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, अविनाश खरात, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, जनरल मॅनेजर (टेक्निकल) पी. डी. राक्षे, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील, सहा. शेती अधिकारी अजय दुपटे, सहा. ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर आदीसह शेतकी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे शेतकर्यांसह ऊस तोडणी कामगारांना मोठा फटका बसला आहे. निसर्गाच्या तडाख्याने शेतकरी व ऊसतोड मजूर कोंडीत सापडला आहे. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तोडणी मजुरांचे हाल होत आहेत. पावसामुळे संपूर्ण धान्य व संसार उपयोगी साहित्य पाण्यात भिजले आहे. त्यामुळे ऊसमजूर चिंताग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने ऊसतोड मजुरांसाठी जीवनावश्यक वस्तू वाटपाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 5000 जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर ऊसतोड मजुरांच्या जनावरांना गोळी पेंड देण्यात येत आहे. कारखान्याच्या संचालकांकडून त्यांच्या भागातील ऊसतोड मजूरांना भोजनाची तसेच मजूरांच्या निवार्याची सोय करण्यात येत आहे.
कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले ऊसतोड मजुरांना धीर देत म्हणाले, कृष्णा कारखाना व ऊसतोड मजुरांचे अनेक पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. अडचणीच्या काळात कृष्णा कारखाना नेहमी ऊसतोड मजुरांच्या पाठीशी उभा राहिला आहे. यापुढेही उभा राहणार आहे. आज त्यांना कारखान्याच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा देण्याचे काम करू, अशी ग्वाही डॉ. भोसले यांनी दिली.
ऊसतोड मजुरांना धीर
ऊस तोडीची लगबग सुरू असताना अचानक अवकाळी पावसाने ऊसतोड मजुरांचे काम थांबले. मुसळधार पावसामुळे संसारपयोगी साहित्याचे व अन्नधान्याचे नुकसान झाले. खोपटात पावसाचे पाणी शिरल्याने ऊसतोड मुजरांचे संसार उघड्यावर पडले. अशा प्रसंगात कृष्णा कारखान्याने जीवनावश्यक वस्तू व जनावरांना खाद्य देऊन धीर देण्याचे काम केले आहे, अशी भावना ऊसतोड मजूर व्यक्त करत आहेत.
COMMENTS