पेशवेकालीन बालाजी मंदिराचा होणार जीर्णोध्दार ; नगर अर्बन बँक चौकात भूमिपूजन उत्साहात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेशवेकालीन बालाजी मंदिराचा होणार जीर्णोध्दार ; नगर अर्बन बँक चौकात भूमिपूजन उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरातील अर्बन बँक चौकात असलेल्या आणि 203 वर्षांपेक्षाही अधिक काळाच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या पेशवेकालीन ऐतिहासिक डांगे

नेवाशाच्या पावन गणपतीला भाविकांची चतुर्थीनिमित्त गर्दी
दूध उत्पादकांचा येवला पैठणी देऊन सन्मान
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरातील अर्बन बँक चौकात असलेल्या आणि 203 वर्षांपेक्षाही अधिक काळाच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या पेशवेकालीन ऐतिहासिक डांगे बालाजी मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात येणार आहे. डांगे परिवारातील ज्येष्ठ सदस्य सतीश डांगे व त्यांच्या पत्नी सुहास डांगे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मंदिराच्या जीर्णोध्दाराचा शुभारंभ करण्यात आला.
203 वर्षांपूर्वी म्हणजे सन 1818 मध्ये फाल्गुन वद्य आमलकी एकादशीच्या मुहूर्तावर या मंदिराची स्थापना करण्यात आली. पंचधातूंपासून तयार केलेली प्रसन्न मुद्रेतील भगवान श्री बालाजीची मूर्ती, उजव्या बाजूला देवी लक्ष्मी, डाव्या बाजूला देवी पद्मावती यांची मूर्ती आहे तसेच येथे पावन श्रीगणेशाची मूर्ती असून या मूर्तीची ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात देखील नोंद आहे. या मूर्तीजवळ मारूतीच्या जय विजय अशा रूपातील दोन अनोख्या मूर्ती आहेत. भगवान श्रीविष्णु यांच्या विराट रुपाचे दर्शन घडविणारी अतिशय दुर्मिळ अशी दशमुखी श्री विष्णुंची मूर्ती तसेच तांबे धातूमध्ये तयार केलेली गरूडाची मूर्ती असून पोशाख व गरुडाचे पंख हे पितळी धातूपासून तयार केलेले आहेत. याशिवाय नर्मदा नदीच्या पाण्यातील 2 बाण व इतर अनेक देवांच्या मूर्ती देखील या मंदिरात आहेत. मंदिरातील सर्व मूर्ती या पंचधातूंपासून बनविण्यात आलेल्या असल्याने त्यांना सोन्यासारखी झळाळी आहे. त्यामुळे या मूर्ती भाविकांना भारावून टाकतात. शिसम लाकडापासून तयार केलेल्या आकर्षक व सुंदर अशा साडेपाच फूट उंचीच्या देवघरात या मूर्ती स्थापित करण्यात आलेल्या आहेत. तिरूपती बालाजी मंदिरातील प्रथा व परंपरेनुसार डांगे यांच्या बालाजी मंदिरात पूजाविधी होतात. डांगे परिवाराने दानशूर नागरिक व बालाजी भक्तांच्या सहकार्याने या मंदिराचा जीर्णध्दार करण्याचे काम हाती घेतले आहे. संपूर्ण देशात ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असणार्‍या अहमदनगर शहरात आज देखील अनेक ऐतिहासिक व पौराणिक, धार्मिक इमारती मोठ्या दिमाखाने इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.अशाच इमारतींपैकी डांगे बालाजी मंदिर आहे. नगर शहरासह आसपासच्या परिसरातील असंख्य बालाजी भक्तांच्या श्रध्देचे स्थान असलेल्या डांगे बालाजी मंदिराचा मूळ गाभा कायम ठेवून जीर्णोध्दार करण्यात येणार आहे.

COMMENTS