Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा नगराध्यक्षांच्या बोटचेप्या धोरणामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार रखडला : अमोल मोहिते यांचा आरोप

सातारा / प्रतिनिधी : डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्काराच्या विषयावर मी गप्प बसलेलो नाही. नगरपालिकेकडे सातत्याने मी पाठपुरावा केला आहे.

इस्लामपूरात 19 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा : विजयबापू पाटील
प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी एमपीएससीकडून अधिसूचना
तामकणेच्या नाथ मंदीराच्या कामासाठी मदतीचे आवाहन

सातारा / प्रतिनिधी : डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्काराच्या विषयावर मी गप्प बसलेलो नाही. नगरपालिकेकडे सातत्याने मी पाठपुरावा केला आहे. मात्र, सातारा विकास आघाडीच्या बोटचेपी धोरणामुळे पुरस्काराचे वितरण होवू शकलेले नाही. ’साविआ’कडून पुरस्कार देण्यासाठी चालढकल केली आहे. त्यामुळे पुरस्कार रखडला आहे, अशी टीका नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांनी केली.
अमोल मोहिते यांनी पत्रकात म्हंटले आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार देण्याचा विषय मी स्वत: पुढाकार घेवून सातारा नगरपालिकेत मंजूर करुन घेतला होता. पहिल्या वर्षीपासून समाजातील मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सातारा विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर हा पुरस्कार देण्यास चालढकल केल्याने त्यांच्या विरोधात तीन दिवस नगरपालिकेच्या दारात मी धरणे आंदोलन केले होते. माझ्या आंदोलनाची दखल घेवून दोन वर्षानंतर ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना पुरस्कार दिला होता. त्यानंतर पुन्हा सलग तीन वर्षे हा पुरस्कार दिला नाही. त्याकडे मी ’साविआ’चे लक्ष वेधले होते. मात्र, टक्केवारीच्या आणि गटातटाच्या राजकारणात अडकलेल्या ’साविआ’ला चांगले काम करण्यासाठी वेळ नाही. त्यांची काळीकुट्ट कारकिर्द संपायला अवघा एक महिना शिल्लक राहिला आहे. तरी चांगले निर्णय घेण्याची सुबुध्दी त्यांना मिळत नाही. सातारकरांनी त्यांचा कारभार पाच वर्षे उघड्या डोळ्यांनी बघितला आहे. सातारा विकास आघाडीला त्याची किंमत मोजायला लागणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पुरस्काराच्या वितरणासाठी आवाज उठवला, याबद्दल त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. त्यांनी निश्‍चितपणे आंदोलन करावे. त्यांच्या आंदोलनाला आमचा सक्रीय जाहीर पाठींबा असेल. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याविषयी आदर असल्याने हा पुरस्कार सुरु करण्यात आला होता. मात्र, सातारा नगरपालिकेतील सत्ताधार्‍यांना त्याविषयी आदर वाटत नाही, अशीच त्यांची भूमिका आहे, असेही अमोल मोहिते यांनी म्हटले आहे.

नगराध्यक्षांचा हात थरथरतो?
नगराध्यक्षांच्या टेबलवर गेल्या 15 दिवसापासून डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्काराच्या निवडीचे पत्र स्वाक्षरीसाठी ठेवले आहे. मात्र, त्यांनी त्यावर सही करायला नकार दिला आहे. टक्केवारी मिळणार असलेल्या कामाच्या फाईलवर धडाधड सह्या करणार्‍या नगराध्यक्षांचा हात डॉ. दाभोलकर स्मृती पुरस्काराच्या पत्रावर सही करताना थरथर की कापतो, हेच समजत नाही, अशी टीका अमोल मोहिते यांनी केली आहे.

COMMENTS