पोलिस भरतीचा पेपर फुटल्याची अफवा पसरविणार्‍यावर गुन्हा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस भरतीचा पेपर फुटल्याची अफवा पसरविणार्‍यावर गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी : सन 2019 मधील पोलिस पदाच्या दिनांक 14 नोव्हेंबर रोजी होणार्‍या लेखी परीक्षेबाबत सोशल मीडियाच्या ट्विटरद्वारे अफवा पसरवून आणि त्यात

रहिवासी भागातील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा… मनविसेची मागणी
अजित पवार आणि भाजप नेते राम शिंदे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा LokNews24
लोकमंथन व लोकन्यूज-24 ने केला कोरोना सेवाकार्याचा गौरव ; कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करणारे राज्यातील पहिले मराठी मिडिया हाऊस

अहमदनगर/प्रतिनिधी : सन 2019 मधील पोलिस पदाच्या दिनांक 14 नोव्हेंबर रोजी होणार्‍या लेखी परीक्षेबाबत सोशल मीडियाच्या ट्विटरद्वारे अफवा पसरवून आणि त्यातून परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये भय पसरवून असंतोष व भयग्रस्त वातावरण बनवून सार्वजनिक शांततेविरुद्ध अपराध करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी की दि.14 नोव्हेंबर रोजी होणार्‍या बृहन्मुंबई पोलिस पदाच्या पेपरबाबत अफवा पसरविणारा तरुण निलेश दिलीप पोटे (वय 26 वर्षे, रा. बारादरी, ता. नगर जि.नगर) याने ट्विट केले की, बृहन्मुंबई पोलीस पदाची होणारी लेखी परीक्षा 14 नोव्हेंबरला राज्यात विविध केंद्रावर होणार आहे. तरी अहमदनगरवरील काही केंद्रावर मुंबई पोलिसांचा पेपर फोडण्याच्या बातम्या येत आहेत तरी यावर आपण तातडीने कारवाई करावी, अशी विनंती… असे ट्विट केल्याने चौकशीकामी असे ट्विट करणार्‍याची पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलिस ठाण्यामार्फत चौकशी केली असता, चौकशीमध्ये त्याने त्याचे नाव निलेश दिलीप पोटे (वय 26 वर्षे, रा. बारादरी, ता. नगर, जि.नगर) असे सांगितले व तो या परीक्षेतील एक उमेदवार असल्याचे समजले. त्याचप्रमाणे त्याने त्याच्या मोबाईलवरून ते ट्विट केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिस भरतीचा पेपर फुटल्याबाबतची अफवा पसरविणार्‍या या उमेदवाराविरुद्ध सहायक पोलिस निरीक्षक संजय महादेव सुर्वे (वय 57 वर्षे, नेमणूक- मुंबई वाहतूक विभाग, दिंडोशी) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात समक्ष फिर्याद दिली आहे. मुंबई पोलीस पदाच्या होणार्‍या लेखी परीक्षेबाबत निलेश पोटे याने तो करीत असलेल्या ट्विटने बाकी परीक्षार्थी विद्यार्थांमध्ये भय पसरवून असंतोष किंवा भयग्रस्त वातावरण निर्माण होऊन परीक्षार्थी हे सार्वजनिक शांततेविरूद्ध अपराध करण्यास प्रवृत्त होतील याची जाणीव असताना देखील निलेश पोटे याने ट्विटर द्वारे ट्विट केल्याने त्याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांना आवाहन
सर्व नागरिक व उमेदवार यांना अहमदनगर पोलीस दलातर्फे जाहीर आवाहन करण्यात येते की, पोलीस पदाच्या लेखी परीक्षेचा पेपर हा सुरक्षित असून वरील ट्विट करण्यात आलेली अफवा असून त्यावर विश्‍वास ठेवू नये. अहमदनगर पोलिस हे अशा अफवा पसरविणार्‍यांवर लक्ष ठेवून असून जो कोणी अशा बृहन्मुंबई प्रकारची अफवा पसरवेल, त्याच्याविरुद्ध कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, तसेच सुजाण नागरिकांना अशी अफवा पसरविणारे निदर्शनास आले तर तात्काळ नियंत्रण कक्ष, अहमदनगर 0241-2416100 व 0241-2416138 अथवा डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

COMMENTS