पारनेरच्या पत्रकाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारनेरच्या पत्रकाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : पारनेर येथील पत्रकार संजय वाघमारे याच्याविरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकरणी हनुमंत भोसले (रा

निळवंडे धरणाच्या पंचम सुधारीत प्रशासकीय मंजुरी
शिक्षक मतदार संघाची अशी असेल मतदान प्रक्रिया
अय्यप्पा मंदिरात १६ नोव्हेंबर मकर विल्लकु महोत्सवास प्रारंभ  

अहमदनगर/प्रतिनिधी : पारनेर येथील पत्रकार संजय वाघमारे याच्याविरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकरणी हनुमंत भोसले (रा.शिरापूर, ता. पारनेर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान, खंडणीप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यातील माध्यम वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी हनुमंत भोसले हे शिरापूर गावचे विद्यमान सरपंच आहेत. त्यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी कुठल्याही प्रकारे वाळू तस्करी करत नाही व त्यासंदर्भात माझ्याविरुध्द कोणत्याही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल नाही तसेच मी कोणत्याही प्रकारे पोलिसांकडे कोणाचीही मध्यस्थी केलेली नाही. तरी देखील संजय वाघमारे यांनी मला वेळोवेळी महिन्याला 20 हजार ते 25 हजार रुपये खंडणीची मागणी करुन पैसे न दिल्यास माझी बदनामी करण्याची तसेच माझ्यावर वाळू तस्करीचे गंभीर आरोप करुन मला मोक्क्यासारख्या गंभीर गुन्हयात गुंतवून जेलमधून सुटू न देण्याची धमकी देऊन माझ्याकडून आजपावेतो वेळोवेळी 1 लाख रुपये खंडणी वसूल केली असून मी त्याचे फोन उचलणे बंद करुन खंडणीचे पैसे न दिल्याने त्यांनी माझ्याविषयी त्याच्या साथीदारांसह मिळून राष्ट्र सहयाद्री या वृत्तपत्रात व इतर पोर्टलवर मला उद्देशून शिरापूरचा सरपंच व वाळू तस्कर, घाटाखालील भागात पोलिसांचा दलाल, पोलिसांच्या दप्तरी फरार…इत्यादी असे बदनामीकारक शब्द वापरुन माझ्या नावलौकीकास नुकसान पोचविले आहे. तसेच माझ्या वाढदिवसाची जाहिरात राष्ट्र सहयाद्री, लोकसत्ता तसेच विदर्भ व मराठवाडामधील सात ते आठ वृत्तपत्रांत देतो असे म्हणून माझ्याकडून 20 हजार रुपये रोख स्वरुपात घेतले व माझी वाढदिवसाबाबत जाहिरात न छापता माझी फसवणूक केली म्हणून माझी संजय वाघमारे (रा.पारनेर, ता.पारनेर, जि.अहमदनगर) व त्याच्या साथीदारांच्याविरुध्द फिर्याद आहे, असे म्हटले आहे.

वर्षापूर्वी झाली ओळख
या फिर्यादीत म्हटले आहे की, सुमारे एक वर्षापूर्वी वाघमारे यांची ओळख झाल्यानंतर त्यांनी मला तुमच्या चांगल्या कामाची जाहिरात राष्ट्र सहयाद्री, लोकसत्ता तसेच विदर्भ व मराठवाडामधील सात ते आठ वृत्तपत्रांत देतो असे म्हणून माझ्याकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. मी त्यांना वेळोवेळी मला कोणतीही जाहिरात करायची नाही, असे सांगितले होते. तरी देखील ते मला वेळोवेळी पैशाची मागणी करीत होते. दिनांक 2 मे 2021 ला माझा वाढदिवस असल्याची वाघमारे यांना माहिती मिळाल्याने त्यांनी एप्रिल 2021 मध्ये मला, मी तुमची वाढदिवसाची जाहिरात आमचे राष्ट्र सहयाद्री, लोकसत्ता तसेच विदर्भ व मराठवाडामधील सात ते आठ वृत्तपत्रात देतो असे म्हणून 20 हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे मी त्यांना 20 हजार रुपये रोख स्वरुपात बस स्टॅण्डजवळ पारनेर येथे दिले. त्यावेळी मित्र अर्जून लामखडे हे समक्ष हजर होते. पण, वाघमारे यांनी माझ्या वाढदिवसाची कोणतीही जाहिरात दिली नाही. त्याबाबत मी त्यांना विचारणा केली असता त्यांनी मला, तू धुतल्या तांदळासारखा नाहीस. तू मला जाब विचारणारा कोण? तू यापुढे देखील महिन्याला 20 हजार ते 25 हजार रुपये देशील, असे मला धमकीवजा सुनावून पैसे न दिल्यास माझी बदनामी करण्याची तसेच माझ्यावर वाळू तस्करीचे गंभीर आरोप करुन मला मोक्क्यासारख्या गुन्हयात गुंतवून जेलमधून सुटू न देण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

COMMENTS