नगर - प्रत्येक व्यक्ती हा सर्वगुणसंपन्न असतो, असे होत नाही. प्रत्येकात काही ना काही लुप्त कलागुण दडलेले असतात. काही व्यक्त होतात, तर काहींना व्यक
नगर –
प्रत्येक व्यक्ती हा सर्वगुणसंपन्न असतो, असे होत नाही. प्रत्येकात काही ना काही लुप्त कलागुण दडलेले असतात. काही व्यक्त होतात, तर काहींना व्यक्त होण्यासाठी किंबहुना आपल्या कलागुणांना एक चांगले व्यासपीठ मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. त्यांना आपल्या कलागुणांची नशा रक्तात उतरावी लागते. गद्य व पद्य, तसेच साहित्याची, लेखनाची व प्रकाशनाची नशा व्यक्तीला समाजात पद, प्रतिष्ठा व सन्मानाने जगणे शिकवते. याची शान काही वेगळीच असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिनेगीतकार व साहित्यिक बाबासाहेब सौदागर यांनी कवी सखाराम गोरे लिखित ‘आभाळमाया’ या चौथ्या कवितासंग्रह प्रकाशन सोहळ्याप्रसंगी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कोरोनाचे सर्व नियम पाळून दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. यावेळी ते बोलत होते
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कवीवर्य चंद्रकांत पालवे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. गुंफाताई कोकाटे, साहेबराव ठाणगे, पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. संदीप सांगळे, मसापचे जयंत येलूलकर, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, नंदकुमार आढाव, प्रकाशक प्रा. गणेश भगत, संतोषकुमार गोरे, शिवप्रसाद गोरे, बाळासाहेब चौधरी, अजय ढमाले, सौ. हिराबाई गोरे, सुनीता चौधरी, स्वाती ढमाले व जिल्ह्यातील ज्येष्ठ व नवोदित कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. सौदागर म्हणाले की, कवी सखाराम गोरे यांचा संघर्ष मी जवळून पाहिलेला आहे. फुलांचा हार हा व्यक्तीला बळ देतो, तर पाठीवरचा प्रहार संघर्षातून जगण्याची जिद्द देतो. कवी सखाराम गोरे यांनी संसाराचा गाडा ओढत आपल्या कवितांना जिद्दीचे बळ देत छंद जोपासला याबद्दल मी त्यांचे कौतुक करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. गुंफाताई कोकाटे म्हणाल्या की, सखाराम गोरे यांनी आपल्या कविता संग्रहातून तरुणाई माया निसर्ग आणि लावणी रुप अशा चौफेर कवितांमधून आभाळमाया साकारली आहे आणि त्या समाजापुढे मांडल्या. त्यांच्यातील सृजनशील कवी यातून दिसतो आणि आज त्यांचा 72 वा जन्मदिवस देखील साजरा करण्याचा योग आम्हाला मिळाला, हे भाग्य. अशीच आभाळमायाची प्रकाशने प्रकाशित व्हावीत, हीच सदिच्छा व्यक्त करते, असे त्यांनी सांगितले
यावेळी कविवर्य चंद्रकांत पालवे, साहेबराव ठाणगे, मुकेश दादा मुळे, डॉ. संदीप सांगळे, जयंत येलूलकर, प्राचार्य खासेराव शितोळे, नंदकुमार आढाव आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रकाशक प्रा. गणेश भगत यांनी केले, तर सूत्रसंचालन टेकाळे सर यांनी केले. शिवप्रसाद गोरे यांनी आभार मानले.
COMMENTS