भाजपमध्ये गेल्याने विखेंना येते शांत झोप..पालकमंत्री मुश्रीफांनी लगावला टोला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपमध्ये गेल्याने विखेंना येते शांत झोप..पालकमंत्री मुश्रीफांनी लगावला टोला

अहमदनगर/प्रतिनिधी - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारच्या नगर दौर्‍यात राजकीय भाष्य करताना विखे व पाचपुतेंना शाब्दीक टोले लगावले. भाजपचे खासदार डॉ.

महिलांना लेखन कलेत अनेक संधी- डॉ.ऋचा शर्मा
विविध मान्यवरांचा गोल्डन ग्रुपच्या वतीने राहुरीत सत्कार
वरखेड यात्रा नियोजनासाठी उद्या नगरला होणार बैठक

अहमदनगर/प्रतिनिधी – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारच्या नगर दौर्‍यात राजकीय भाष्य करताना विखे व पाचपुतेंना शाब्दीक टोले लगावले. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी पालकमंत्री त्यांचे बॅलन्सशीट चेक करीत असल्याचा आरोप केला होता, त्याबद्दल बोलताना मुश्रीफ यांनी, आमच्याकडे शीट आहे आणि त्यांच्याकडे (विखे) बॅलन्स आहे व भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांना आता शांतपणे झोप लागत असावी, असा टोला लगावला. दरम्यान, शेतकर्‍यांच्या नुकसानीच्या संदर्भामध्ये भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी, पाचपुते हे ज्येष्ठ आहेत व ते आमचे नेते होते. आता त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला.
नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठकीनंतर मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकार पडत नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचा भाजपचा डाव चालू आहे, पण तो कधीच यशस्वी होणार नाही. माझ्यावर जे सोमय्या यांनी आरोप केले, ते अत्यंत चुकीचे असून दूध का दूध-पानी का पानी होणार आहे. मी आयुष्यात कधीच लबाडी केली नाही, असे स्पष्ट करून मुश्रीफ म्हणाले, सरकार पडत नाही म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला व मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप करत आहेत. पण आता भाजपच्या विरोधात सुद्धा आमचे मंत्री निश्‍चितपणे बोलतील. सोमय्या यांनी जे काही माझ्यावर आरोप केलेले आहेत त्याला मी प्रत्युत्तर सुद्धा दिलेले आहे, असे ते म्हणाले. ज्या वेळेला भाजपाचे सरकार राज्यामध्ये होते, त्या वेळेला रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणावर झाली आहे व तेच रस्ते आता आम्ही लवकरात लवकर दुरुस्त करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. डिझेल पेट्रोलचे दर वाढत चाललेले आहेत. मोदी सरकार या विषयाकडे लक्ष द्यायला तयार नाही. दर वाढल्यामुळे निश्‍चितच कर सुद्धा त्यावर वाढला आहे. आम्ही आंदोलने केली व सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, केंद्र सरकार या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादीकडेच पालकमंत्रीपद
राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. नगर बरोबर कोल्हापूरमध्ये सुद्धा या निवडणुका आहेत. त्यामुळे मला कोल्हापूरकडे लक्ष देणे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी श्रेष्ठींच्या बैठकीमध्ये पालकमंत्री पदाचा विषय केला होता, असे त्यांनी सांगून ते म्हणाले, मी कोल्हापूरच्या निवडणुकीकडे लक्ष देणार असल्यामुळे दोन्हीकडे मला लक्ष देता येणार नाही असे सांगितले. याचा अर्थ मला नगरचे पालकमंत्री पद नको असे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पण, श्रेष्ठी जो काही निर्णय घेतील, तो मला मान्य राहील असे त्यांनी सांगितले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद राहील असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अनेक संकटे आली. दोन वर्ष पूर्ण होताच कोरोना तसेच चार चक्रीवादळे आली. मात्र, कुठे न डगमगता यातून मार्ग काढून सरकार आता पुढे जात आहे. निधी नसल्यामुळे अनेक कामे करता आली नाही. कोरोनाच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींचा व जिल्हा नियोजनाचा निधी सुद्धा आम्ही खर्च करत आहोत. भविष्यामध्ये तिसरी लाट येऊ नये व जर आलीच तर त्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यातील ग्राम विकास विभाग तसेच नगर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी आणि जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका सदस्य यांच्यामार्फत आता शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी निर्णय घेतला असून तात्काळ त्याची अंमलबजावणी सुरू होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

एकमताने उमेदवारी
नगर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. त्या संदर्भात बोलताना मुश्रीफ म्हणाले, स्थानिक पातळीवर अधिकार दिलेले आहेत. ज्या ठिकाणी एकमत होईल, तेथे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली जाईल, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. स्थानिक पातळीवरच्या लोकप्रतिनिधींना त्याबाबतचे अधिकार सुद्धा देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कर्डिले तेथे कसे आले?
पालकमंत्री शोधून सापडत नाहीत या माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या आरोपावर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, मी काल अकोल्यामध्ये होतो, ते (कर्डिले) आडवाटेने आले असते तर माझी भेट झाली असती. पण, काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यक्रमालाही कर्डिले उपस्थित होते. खरे तर ते फडणवीस गटाचे असल्याने त्या कार्यक्रमाला येणार नाहीत, असे मला वाटले होते, असे सूचक प्रत्युत्तर मुश्रीफ यांनी कर्डिले यांना दिले.

COMMENTS