नेवासा/ तालुका प्रतिनिधी - तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी अपक्ष निवडणूक लढवण्याचे धाडस केले. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास करता याव
नेवासा/ तालुका प्रतिनिधी –
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी अपक्ष निवडणूक लढवण्याचे धाडस केले. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास करता यावा, तालुक्यातील प्रश्नांचे ओझे हलके करता यावे यासाठी मंत्रिपदाचा स्वीकार केला. या मंत्रिपदाचा वापर केवळ तुमच्या सर्वांच्या विकासासाठी करणार असल्याचे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी केले. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे नामदार शंकरराव गडाख यांनी गावातील व परिसरातील विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी घोंगडी बैठकीचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वरचे संचालक बाजीराव मुंगसे होते.
यावेळी प्रास्ताविक करतानी सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी नामदार शंकरराव गडाख यांच्या आग्रहाखातर या बैठकीचे आयोजन केल्याची माहिती दिली. तसेच गावातील व परिसरातील विविध प्रश्नांची माहिती दिली. यामध्ये जमिनीच्या पोटखराब्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, पाणंद रस्ते व इतर रस्त्यांचा प्रश्न या समस्या मांडल्या. यावेळी लक्ष्मण बनसोडे, माजी आमदार पांडुरंग अभंग, दादा पाटील घोडके यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, मार्केट कमिटीचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शिंदे, माजी सरपंच दत्ता मुंगसे, माजी उपसभापती कारभारी चेडे, कडूभाऊ तांबे, महादेव मुंगसे, रामेश्वर गोयकर, उपसरपंच लक्ष्मण गोयकर, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, संतोष म्हस्के, बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, जेष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, नवनाथ मुंगसे, सुभाष मुंगसे, चंद्रभान कदम, उद्धव मुंगसे, दादासाहेब एडके, संतोष तांबे, श्रीकांत हिवाळे, ग्रामपंचायत सदस्य महादेव पुंड, भारत कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रमेश मुंगसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी विविध संघटनेच्यावतीने आमदार शंकरराव गडाख यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये दयासागर ग्रुप, हिवाळे परिवार, ग्रामसेवक, तलाठी व आदर्श कोतवाल अविनाश हिवाळे यांच्या वतीनेही नामदार गडाख यांचा सन्मान करण्यात आला. नामदार गडाख पुढे म्हणाले की, तालुक्याला आत्तापर्यंत मंत्रिपद न मिळाल्याने इतर तालुक्यांच्या तुलनेत आपल्या तालुक्याचा विकास झाला नाही. तो अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. वाड्या-वस्त्यावरील रस्ते पूर्ण करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. निधीची उपलब्धता झाल्यानंतर विजेचे सर्व प्रश्न सोडवण्यात येतील. घरकुल, रेशन कार्डचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जमिनीच्या पोटखराब्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊ. मुळा उजव्या कालव्याचे दुरुस्तीसाठी प्रयत्नशील आहोत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केले. तर इन्नुस पठाण यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामपंचायत सदस्य अशोक मुंगसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
COMMENTS