कोरोना रुग्णांना देण्यात येणार्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा अद्यापही दूर झालेला नाही.
अहमदनगर/प्रतिनिधीः कोरोना रुग्णांना देण्यात येणार्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा अद्यापही दूर झालेला नाही. त्यामुळे हे इंजेक्शन मिळविण्यासाठी प्रयत्न करणार्या रुग्णांच्या नातेवाइकांनी आता आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. अनेक ठिकाणी फिरूनही औषध न मिळाल्याने केडगाव येथे नागरिकांनी नगर-पुणे महामार्गावरच ठिय्या दिला. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात डॉक्टर मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीर औषधाची शिफारस करीत आहेत. त्यासाठी विविध उपाययोजना केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात नातेवाइकांची धावपळ सुरूच आहे. रविवारी शहरात अनेक ठिकाणी फिरून औषध मिळाले नाही. केडगावमधील एका औषध दुकानात हे औषध उपलब्ध असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. त्यामुळे अनेकांनी तेथे घाव घेतली; मात्र तेथे अपुरा साठा होता. अनेकांना इंजेक्शन मिळाले नाही. नवीन साठा येत असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र कालपासून वाट पाहून थकलेल्या नातेवाइकांनी अखेर रस्त्यावर धाव घेऊन तेथेच ठिय्या दिला. या ठिकाणी काही नागरिकांनी या दुकानातून चढ्या भावाने विक्री करत असल्याचा असेच ठराविक लोकांनाच इंजेक्शन दिले जात असल्याचा आरोप केला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशानुसार यासाठी नगर जिल्ह्यातही नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यांना कार्यपद्धतीही ठरवून दिली आहे, तरीही यासंबंधी अद्याप नागरिकांनध्ये विश्वासाचे वातावरण निमार्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे कडक टाळेंबदीच्या काळातही रुग्णांच्या नातेवाइकांची औषधासाठीची वणवण सुरूच आहे. त्यातही अपयश येत असल्याने संयम संपल्याने नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. रात्रीपासून सोशल मीडियात एक यादी फिरत आहे. राज्यात कोणाच्या औषध दुकानात रेमडेसिवीरचा किती साठा शनिवारी विकला आहे, त्याची माहिती देणारी ही यादी आहे. नगर जिल्ह्यात यापूर्वी कोणत्या दुकानांत ही औषधे मिळतात, त्याची एक यादी प्रशासनाने जाहीर केली होती; मात्र रात्री व्हायरल झालेल्या यादीत यापेक्षा वेगळी नावे आहेत. प्रशसानाच्या यादीत नाव नसलेल्या या दुकानांत पुरवठा कसा झाला? त्याची माहिती प्रशासनाला मिळाली का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
COMMENTS